"सेझ' रद्द करण्याबाबत
मुख्यमंत्र्यांचे मौन - माथानी
पणजी, दि. 13 (प्रतिनिधी)- राज्यातील "सेझ" रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केली खरी, परंतु ती रद्द करण्याबाबत काय परिस्थिती आहे, याबाबत ते मौन बाळगून असल्याने "सेझ' विरोधी गोमंतकीय चळवळ" संघटनेतर्फे चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
संघटनेचे निमंत्रक माजी मंत्री माथानी साल्ढाणा यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक बोलावण्यात आली. मुख्यमंत्री कामत 'सेझ" रद्द करण्याचे धाडस केल्याची वक्तव्ये करीत आहेत, परंतु ते रद्द न करता अन्य प्रकारे त्याची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न झाल्यास ते हाणून पाडले जातील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
'सेझ' साठी देण्यात आलेल्या लाखो चौरस मीटर जागेचा प्रश्न महत्त्वाचा असताना त्या परत करण्यासंबंधी सरकार काहीच हालचाली करीत नाही. या जमिनींवर नजर ठेवून असलेल्या दिल्लीतील काही उद्योजकांनी खास विकास विभागांच्या नावाने या जमिनींचा विकास करण्याचा प्रस्ताव सरकारकडे ठेवल्याचे खात्रीलायक वृत्त असून या पडद्यामागील भानगडींचा पर्दाफाश करणार असल्याचेही श्री. साल्ढाणा म्हणाले.
राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खाण उद्योगाला उधाण आले आहे व सरकारचे या बाबतीत कोणतेच नियंत्रण राहिलेले नाही, असेही माथानी यांनी सांगितले. विविध उद्योगांतील गोमंतकीय कामगारांबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करून रोजगार नोंदणी केंद्रातील नव्या बेरोजगारांची यादी ताबडतोब जारी करावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. राज्याच्या गरजेप्रमाणे विकास व्हावा असे सांगून विनाकारण विकासाच्या नावाने राज्यात इतर राज्यातील लोकांचा भरणा वाढत चालल्याचा धोकाही त्यांनी बोलून दाखवला.
Thursday, 14 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment