आणखी सहा क्रशरना सील
मडगाव, दि.9 (प्रतिनिधी) - मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जाहीर केलेल्या आदेशानुसार काल नेसाय भागातील बेकायदा खडी फोडणाऱ्या 32 क्रशरांचा जिल्हाधिकाऱ्यांनी वीजपुरवठा खंडीत करून ते बंद पाडले होते, आज सालझोरा येथील सहा व सां जुझे आरियल येथील क्रशरचे काम बंद पाडले.
54 क्रशरांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आलेली होती. पण 15 क्रशर मालकांकडे कायदेशीर परवाने असल्याने ते बंद पाडण्यात आले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रसन्न आचार्य, मामलेदार परेश फळदेसाई, मायणा कुडतरी पोलिसांच्या संरक्षणात वीज खात्याच्या अभियंत्यांना बरोबर घेऊन त्यांचा वीजपुरवठा तोडून टाकला.
वरील भागांत बेकायदा खडी फोडीत असल्यामुळे धूळ, ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या तसेच खडी फोडण्यासाठी जिलेटिनचा वापर करून स्फोट घडवून आणत असल्याने घरांना धोका निर्माण झाला होता. कित्येक घराच्या भिंतीचे तडे गेलेले होते. जिल्हाधिकाऱ्यापासून खाण संचालनालयापर्यंत पर्यंत करूनही कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी दोन महिन्यांपूर्वी बेकायदेशीर क्रशरविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. त्यावर सुनावणी होऊन त्या कारवाया बंद करण्याचा आदेश दिला. त्या खाणी व क्रशर बंद करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवली होती. 12 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी व पोलिसांनी तो बंद केल्याचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करावा, असे गोवा खंडपिठाने एलसी कॉस्ता व इतरांनी सादर केलेल्या याचिकेतील प्राथमिक सुनावणीच्या वेळी दिला. त्यानुसार आज क्रशरवर कारवाई करण्याची मोहीम सायंकाळपर्यंत सुरू होती.
Sunday, 10 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment