संजय दत्त मान्यताशी गोव्यात विवाहबद्ध
मुंबई, दि. ११ - अभिनेता संजय दत्त आणि गर्लफ्रेंड मान्यता गेल्या सात फेब्रुवारीस गोव्यात "ताज एक्झॉटिका' या बाणावली येथील आलिशान हॉटेलमध्ये विवाहबद्ध झाल्याचे आज स्पष्ट झाले. विशेष विवाह कायदा, १९५४ खाली त्यांच्या विवाहाची नोंदणीही केली गेली आहे. त्यासाठी विवाह नोंदणी अधिकाऱ्यांना खास हॉटेलवर पाचारण केले गेले होते. सुनील शेट्टीच्या "ईएमआय' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गोव्यात आलेल्या संजयने मान्यताला अधिक प्रतीक्षा करायला न लावता आपला तिसरा विवाह गुपचूप पार पाडला. संजयने यावेळी मान्यताच्या बोटांत चाळीस लाख रुपये किंमतीची हिऱ्याची अंगठी घातली. शनिवारी मान्यता एका कार्यक्रमास उपस्थित राहिली असता, तिच्या भांगात सिंदूर पाहून पत्रकारांना तिचा विवाह झाल्याची कुणकुण लागली व अखेर आज सोमवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले.
गुपचूप झालेल्या या सोहळ्याला मोजकेच निमंत्रित साक्षीदार या नात्याने उपस्थित होते. मात्र, मुंबईत आज त्यांनी वैदिक परंपरेनुसार पुन्हा एकदा एकमेकांना वरमाला घातल्या. मान्यताचा मित्र प्रदीप याच्या वर्सोवा येथील घरी हा विवाहसोहळा पार पडला.
संजय दत्त याचे रिया पिल्लईशी बिनसल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया गेल्याच महिन्यात पूर्ण झाली. त्याआधी संजय दत्तने अभिनेत्री रिचा शर्माशी विवाह केला होता.
गोव्यात झालेल्या विवाह सोहळ्यास संजय दत्त प्रॉडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी धरम ओबेरॉय, संजयचा मित्र बंटी वालिया आदी मोजकेच मित्र उपस्थित होते. ओबेरॉय यांनीच मान्यताचे गोव्यात कन्यादान केले. त्यांची अभिनेत्री असलेली कन्या नेहा, दत्त यांचा जवळचा मित्र अजय ऊर्फ बिट्टू व प्रशांत यांचीही विवाहसोहळ्यास गोव्यात उपस्थिती होती. यावेळी वर संजय दत्त पिवळा टीशर्ट व जीन्स , तर मान्यता ही जांभळे टीशर्ट व ट्राऊजर अशा साध्या पेहरावात होती.
गोव्यात कायदेशीर विवाह आटोपल्यानंतर संजय दत्त "किडनॅप' या चित्रपटाच्या चित्रपटासाठी लगोलग मुंबईला रवाना झाला.
Tuesday, 12 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment