Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 15 February 2008

मुरगाव बंदरातील काम पूर्ववत
जनतेच्या पाठिंब्याने आंदोलन यशस्वी ः परेरा

वास्को, दि. १४ (प्रतिनिधी)- मुरगांव बचाव अभियानाला एमपीटीविरुद्ध लढा देण्यासाठी वास्कोवासियांनी समर्थन दिल्याने तीन दिवसांच्या आत मुरगाव पोर्ट ट्रस्टला त्याच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या. मुरगाव बचाव अभियान यापुढेही जनतेच्या हितासाठी लढणार असल्याची माहिती अभियानाचे वक्ते श्री. सायमन परेरा यांनी दिली. अभियानाने बंद मागे घेतल्याने आजपासून मुरगाव बंदरातील सर्व कामे पूर्ववत सुरू झाली आहेत.
आज दुपारी मुरगाव बचाव अभियानातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी अभियानाचे प्रवक्ते सायमन परेरा यांच्यासमवेत उपसभापती मावीन गुदिन्हो, मुरगावचे आमदार मिलींद नाईक, अखिल गोवा बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव, वाडे कृती समितीचे वक्ते विष्णू बांदेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. मुरगाव बचाव अभियानाने तीन दिवस सतत मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या विरुद्ध आंदोलन चालविल्यानंतर काल रात्री मुरगाव बचाव अभियान व एमपीटीच्या बरोबर समझोता झाल्यानंतर अभियानाने आंदोलन मागे घेतले. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी श्री. परेरा यांनी पुढे सांगितले की, मुरगांव पोर्ट ट्रस्टकडून चाललेल्या सतावणुकीला उत्तर देण्यासाठी १४ वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन "मुरगाव बचाव अभियाना'ची स्थापना केली व तीन दिवसांपूर्वी त्याच्याविरुद्ध आंदोलनाला सुरुवात केली. आमच्या आंदोलनाला वास्कोवासियांनी पाठिंबा दर्शवून एक दिवस १०० टक्के बंद पाळला तसेच दोन वेळा एमपीटीच्या विरुद्ध काढलेल्या मोर्चात येथील जनतेने भरपूर उपस्थिती लावल्याने आमच्या अभियानाला आणखीन बळ आले. तीन दिवसांच्या आंदोलनानंतर काल एमपीटीला आमच्या मागण्या अखेर पूर्ण कराव्या लागल्या. उशिरा रात्री दोघांमध्ये झालेल्या समझोता करारानंतर मुरगाव बचाव अभियानाने आंदोलन बंद करून पुन्हा एम. पी. टी ला त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वाट मोकळी करून दिल्याचे परेरा यांनी सांगितले. आमच्या आंदोलनात वास्कोवासियांबरोबरच उपसभापती मावीन गुदिन्हो, महसूल मंत्री जुझे फिलीप डिझोजा व आमदार मिलिंद नाईक यांनी भरपूर मदत केल्याने परेरा यांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी उपसभापती श्री. मावीन गुदिन्हो यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की मुरगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच १४ संघटनांनी एकत्र येऊन एमपीटीच्याविरुद्ध न्याय मिळवण्याने हे यश त्यांना प्राप्त झाले. वास्कोतील कोळशाची समस्या दूर करण्याचा एक मुद्दा अभियानाने हातात घेतला होता. आता वास्कोतील कोळसा प्रदूषण दूर होणार असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले. एमपीटीच्या धक्का क्रमांक १० व ११ वर होणारा कोळशाचा साठा हा ४ व ५वर हलविण्यात येणार असून तो फक्त रेल्वेच्या माध्यमाने नेण्यात येणार असल्याने समझोता करारात नमूद करण्यात आले. श्री. गुदिन्हो यांनी सांगितले की, मुरगाव बचाव अभियानाने सत्यासाठी आवाज उठवून तीन दिवस एमपीटीच्याविरुद्ध कडक मोहीम चालविल्यानेच यश प्राप्त झाले असून सत्याच्या बाजूने आपले कार्य असेच चालू ठेवतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी पत्रकारांना माहिती देताना आमदार मिलिंद नाईक यांनी सांगितले की, स्वतःचे नुकसान करून जनतेने सत्यासाठी आवाज उठविला. मुरगाव बचाव अभियानाला शेवटी यश आले. या आंदोलनात आपण सुद्धा आपल्या मतदारसंघाच्या हितासाठी भाग घेतला व पक्षभेद न करता मुरगावच्या हितासाठी केलेल्या सहभागाची आम्हाला चांगली फळे मिळाल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सडा हार्बर येथे असलेल्या १९२२ सालापासूनच्या क्रॉस (खुरिस) ला एमपीटी हात लावणार नाही तसेच महामार्गासाठी सडा येथील जाणाऱ्या घरांना पूर्णपणे वाचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे करारात नमूद केल्याने सडावासियांनी आनंद व्यक्त करण्यात येत असल्याचे मिलिंद नाईक यांनी शेवटी सांगितले.
यावेळी अभियानाचे सदस्य विष्णू बांदेकर, रोनी डिसोझा यांनी पत्रकारांना माहिती देऊन त्यांना मिळालेल्या विजयाचा आनंद व्यक्त केले.

No comments: