हजारोंच्या उपस्थितीत
बाबांना अखेरचा निरोप
नागपूर, दि. 10 - बाबा तुम्हारे सपनों को मंझील तक पहुंचाएंगे, बाबा आमटे अमर रहे , जातपात के बंधन तोडो, भारत जोडो भारत जोडोच्या घोषणांच्या निनादात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हजारो चाहत्यांनी साश्रुनयनांनी मानवतेचा महामेरू बाबा आमटेंना अखेरचा निरोप दिला. आनंदवनातील अनाथ कुष्ठरोग्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तयार केलेल्या शांतीधाम या स्मशानभूमीत अनाम कुष्ठरूग्णाच्या समाधीसमोरच बाबांनी आज सकाळी 11 वाजता चिरविश्रांती घेतली. मृतदेहाला जाळण्यासाठी लागणाऱ्या लाकडात हजार माणसांचा स्वयंपाक होऊ शकतो अशी व्यवहारी भूमिका घेणाऱ्या या पर्यावरणवाद्याला त्याच्या अंतिम इच्छेनुसार दहन न करता जमिनीत पुरुन समाधी देण्यात आली.
बाबा आमटे यांचे काल पहाटे निधन झाले होते. आज सकाळी त्यांचा अंत्यसंस्कार होणार हे जाहीर झाल्यामुळे पहाटेपासूनच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. आनंदवनातील त्यांच्या निवासस्थानी तयार केलेल्या आय.सी.यु.मध्येच त्यांचे निधन झाले होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह त्या कक्षाबाहेर आणून निवासस्थानासमोरच्या चौथऱ्यावर आणून ठेवण्यात आला. त्यांचा अंत्यसंस्कार संपूर्ण शासकीय इतमामाने होणार असल्याने त्यांचे पार्थीव राष्ट्रध्वजात गुंडाळून ठेवण्यात आल्यावर नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी श्रीमती साधनाताई आमटे, पुत्र डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश, मानसपुत्र ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुरेश द्वादशीवार, सुहृद प्राचार्य राम शेवाळकर प्रभृती पार्थीवाजवळ बसले होते. यावेळी अनेक बायाबापड्यांना अंत्यदर्शन होतांना शोक आवरत नव्हता. याठिकाणी व्यवस्थेत असलेले आनंदनिकेतन महाविद्यालयातील एन.सी.सी.चे विद्यार्थी या शोकमग्न चाहत्यांना समजावून बाजूला करून रांगेला वाट करून देत होते. अंत्यदर्शन झाल्यावर आलेले नागरिक इतस्तत: उभे होते. एरवी चैतन्याने फुललेल्या आनंदवनात आज गर्दी असली तरी त्यावर दु:खाची गडद छाया जाणवत होती.
सकाळी साडेनऊच्या सुमारास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आनंदवनात पोहोचले. बाबांच्या पार्थीवावर पुष्पांजली अर्पण केल्यावर त्यांनी आमटे परिवाराचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली.
एका सजवलेल्या वाहनावर बाबांचा पार्थीव देह ठेवण्यात आला. मृतदेहासोबत बाबांचे पुत्र डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, नातू डॉ. दिगंत, डॉ. कौस्तुभ आणि अनिकेत, नात डॉ. शीतल सुन डॉ. पल्लवी, प्रभृती उभे होते. या वाहनामागे बाबांचे चाहते पायी चालत होते. बाबांच्या निवासस्थानासमोरून निघालेली ही अंत्ययात्रा आनंदवन ग्रामपंचायत कार्यालय चौकातून मुक्तांगण मार्गे शांतीधामकडे निघाली. बाबांचे निवासस्थान असलेले गोकुल ते शांतीधाम हे सुमारे 1 किलोमीटरचे अंतर पार करून अंत्ययात्रा शांतीधामात पोहोचली. यावेळी बाबा आमटेंचे चाहते त्यांच्या स्मरणात घोषणा देत होते. शांतीधाममध्ये अंत्ययात्रा पोहोचल्यावर बाबांचा पार्थीव देह शांतीधामात उभारलेल्या एका चौथऱ्यावर ठेवण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख, चंद्रपूरचे पालकमंत्री हाजी अनीस अहमद सार्वजनिक बांधकाम मंत्री अनिल देशमुख, कृषी मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यसभा सदस्य खा. एकनाथ ठाकुर, भा.ज.प. प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी आ. संजय देवतळे, आ. जैनुद्दीन झवेरी, आ. ए.क्यु.झामा, आ. सुधीर मुनगंटीवार, आ. विजय वडेट्टीवार, आ. दिवाकर रावते, निवृत्त न्यायमुर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, ख्यातनाम विधिज्ञ ऍड. श्रीहरी अणे, खनिज विकास मंडळाचे अध्यक्ष अविनाश वारजुकर, विभागीय आयुक्त आनंद लिमये, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत सावरकर, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण प्रभृतींनी पुष्पहार अर्पण करून बाबांना आदरांजली अर्पण केली. यावेळी पोलीस दलाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून बाबांना मानवंदना दिली. त्यानंतर बॅंडवर रिट्रीटचे सूर आळवण्यात आले. नंतर बाबांचे पार्थीव राष्ट्रध्वजातून बाजूला काढून बाबांच्या इच्छेनुसार केळीच्या पानात गुंडाळून त्यांच्या कुटुंबियांनी चौथऱ्याबाजुलाच खणलेल्या खड्डयात ठेवले. नंतर हा खड्डा मिठाने आणि मातीने भरण्यात आला. अनाम कुष्ठरोग्याच्या समाधीस्थळाजवळच बाबांना चिरविश्रांती देऊन उपस्थित सर्वजण जड अंत:करणाने परतले.
बाबांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी आज या परिसरात सुमारे 15 ते 20 हजार नागरिक पोहोचले होते. तयात महिलाही मोठ्या संख्येत होत्या. अंत्यसंस्काराच्या वेळी शांतीधाम परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
यावेळी माजी मंत्री सुलेखा कुंभारे, माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे, राष्ट्रवादी कॉंग्रसचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक धवड, डॉ. रूपा कुळकर्णी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Monday, 11 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment