Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 17 February 2008

मोगुबाई संगीत संमेलन
राष्ट्रीय स्तराचे बनवा ः मुख्यमंत्री
मडगाव, दि. १६ (प्रतिनिधी)ः गोवा मुक्तीनंतर "स्वरमंच' संस्था संगीत क्षेत्राच्या विकासासाठी उत्कृष्ट कार्य करीत असून गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर स्मृती संगीत संमेलन हे कायमस्वरूपी राष्ट्रीय संमेलन बनवावे. त्यासाठी गोवा सरकार सर्वतोपरी सहाय्य देईल अशी ग्वाही मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज दिली.
"स्वरमंच' आयोजित सातव्या गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर स्मृती संगीत संमेलनाचे उद्घाटन विद्याभुवन सभागृहात झाले. आमदार दामोदर नाईक यांनी समई प्रज्वलित करून व मोगुबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री कामत, आमदार दामोदर नाईक, आयोजन समितीचे अध्यक्ष किरण नायक, संस्थेचे अध्यक्ष संजीव प्रभुदेसाई, विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष विष्णू पै रायतुरकर, उपनगराध्यक्ष नारायण पै फोंडेकर, सचिव सुनील नाईक उपस्थित होते.
मडगाव येथे कित्येक वर्षांपासून संगीत नाटकाची जोपासना होते. त्यासाठी मडगावला सांस्कृतिक केंद्राचा दर्जा मिळणे साहजिकच आहे, असे श्री. कामत म्हणाले.
समारंभाचे सन्माननीय अतिथी आमदार दामू नाईक यांनी गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्या संगीताचे महत्त्व विशद केले. मोगुबाईंनी केवळ संगीताचे देणेच दिले नाही, तर किशोरी आमोणकर या जागतिक कीर्तीच्या गायिका दिल्या, असे ते पुढे म्हणाले. फातोर्ड्याचे भूषण ठरेल असे रवीन्द्र भवन पूर्णत्वास येत असून त्याचे उद्घाटन गुडीपाडव्यास करावे, असे दामू नाईक म्हणाले.
आयोजन समितीचे अध्यक्ष किरण नाईक यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष संजीव प्रभुदेसाई यांरनी अहवाल सादर केला. सुनील नाईक यांनी आभार मानले. संजना देसाई, सर्वदा आचार्य, सायली वेर्णेकर, वेष्णवी धारवाडकर, सुजाता देसाई, प्रतीक भट व देवेंद्र देसाई यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले.
शिल्पा डुबळे यांच्या शास्त्रीय संगीताने संमेलनाची सुरुवात झाली. त्यांना दयानंद बांदोडकर व राया कोरगावकर यांनी तबला व हार्मोनिअमची साथ दिली. अनुराधा कुबेर यांचे शास्त्रीय गायन झाले. उद्या दिवसभर आणखी तीन सत्रे होतील.

No comments: