किडनी घोटाळा
डॉ. अमितला
भारतात आणले
नवी दिल्ली, दि. 9 - कोट्यवधी रुपयांच्या किडनी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी डॉ. अमितकुमार याला आज काठमांडूहून इंडियनच्या विमानाने भारतात आणण्यात आले. यावेळी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. दिल्लीत आणल्यानंतर त्याला लगेच सीबीआय मुख्यालयात नेण्यात आले.
सुमारे पाचशेवर लोकांच्या किडन्या बेकायदेशीरपणे काढणाऱ्या आणि देश-विदेशात त्यांची विक्री करणाऱ्या या "डॉ. हॉरर'ला दक्षिण नेपाळच्या चितवानमधील जंगल रिसोर्टमध्ये गुरुवारी अटक करण्यात आली होती. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्तक्षेपानंतर नेपाळ सरकारने आज सायंकाळी त्याला सीबीआयच्या स्वाधीन केले. यानंतर लगेच त्याला इंडियनच्या आयसी-814 या विमानाने दिल्लीकडे आणण्यात आले. या विमानात त्याच्यासोबत सीबीआयचे तीन अधिकारी होते. मीडियाच्या प्रतिनिधींना मात्र विमानात बसण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.
तत्पूर्वी आज सकाळी त्याने नेपाळ अधिकाऱ्यांच्या चौकशीत कबूल केले की, भारतात 350 किडन्यांचे बेकायदेशीरपणे प्रत्यारोपण केले. प्रत्येक किडनी प्रत्यारोपणात आपण तीन ते चार लाख रुपये कमावले असून, काठमांडूतही रुग्णालय स्थापन करण्याची आपली योजना होती.
दरम्यान, गुडगावहून काठमांडूत कायमचे वास्तव्य करण्याची आपली योजना असल्याचे त्याने सुमारे 36 तास चाललेल्या चौकशीत सांगितले. यासाठी काठमांडूत एक अतिथीगृह खरेदी करण्याचाही आपण प्रयत्न केला. पण, त्यापूर्वीच पोलिसांनी मला अटक केली, असेही तो म्हणाला.
सीबीआय मुख्यालयात त्याला आणण्यात आले असता मुख्यालयाला कडेकोट सुरक्षा देण्यात आली होती. सीबीआयने त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले असून, आरोप सिद्ध झाल्यास त्याला किमान दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
नेपाळ सरकार आज त्याला न्यायालयात हजर करणार होते आणि त्याच्याविरुद्ध खटलाही भरणार होते. पण, भारत सरकारच्या विनंतीतील गांभीर्य लक्षात घेऊन नेपाळने त्याला तातडीने सीबीआयच्या स्वाधीन केले.
Sunday, 10 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment