Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 12 February 2008

"संजय दत्त, घोगळ, मडगाव
मान्यता - आके आल्त'
खोट्या पत्त्यांमुळे नवा वाद
मडगाव, दि. ११ (प्रतिनिधी)- संजय दत्त व मान्यताने विवाहाची गोव्यात कायदेशीर नोंदणी केली असली, तरी दोघांनीही आपल्या तात्पुरत्या वास्तव्याचे खोटे पत्ते दिल्याने ही नोंदणी वैध कशी ठरू शकते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. संजय दत्त व मान्यता यांनी गेल्या ७ रोजी विवाहनोंदणी केली. विवाहनोंदणी कायद्यानुसार गोव्यात दोन टप्प्यांत ही नोंदणी केली जाते. अद्याप केवळ पहिल्या टप्प्यातील नोंदणी झालेली असून दुसऱ्या टप्प्यातील होणे बाकी आहे. संजय दत्तने आपण घोगळ, मडगाव येथील असल्याचा पत्ता विवाह नोंदणीसाठी केलेल्या अर्जात नोंदवला आहे. मान्यता हिचे नाव "दिलनशील अहमद शेख' असे देण्यात आले असून तिचा पत्ता आके - आल्त, मडगाव असा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोघेही तेथील रहिवाशी असल्याचा दाखला तलाठ्याने दिला आहे.
या विवाहनोंदणीसाठी अधिकाऱ्यांनाच हॉटेलवर बोलावले गेले होते असे सांगितले जात आहे. ते खरे असेल तर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणासारख्या गंभीर मामल्यातील आरोपी असलेल्या संजय दत्तच्या विवाह नोंदणीसाठी सरकारी अधिकारी हॉटेलवर कसे गेले असा प्रश्नही निर्माण होत आहे. शिवाय विवाहनोंदणीसाठी केलेल्या अर्जातील माहिती खरी असणे बंधनकारक आहे. मग अर्जातील पत्ते हे खोटे असल्याचे उघडउघड दिसून येत असताना हे खोटे पत्ते तलाठ्याने ग्राह्य कसे धरले, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या विवाहाची पहिली नोंदणी झाली असल्याने मडगाव विवाहनोंदणी कचेरीच्या फलकावर नागरिकांच्या हरकती मागवणारी सूचना लावली गेली आहे. एखाद्या जागृत नागरिकाने खोट्या पत्त्यांना हरकत घेतली, तर संजय - मान्यताची विवाह नोंदणीच नव्हे, तर नोंदणी करून घेणारे अधिकारीही पेचात येऊ शकतात.

No comments: