Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 12 February 2008

बेपत्ता अनिशाचा मृतदेह
तिच्याच घरात आढळला

खुनाच्या कारणाबाबत गूढ
सावर्डे, दि. ११ (प्रतिनिधी)- गेल्या आठ फेब्रुवारी रोजी राहत्या घरातून कथित अपहरण झालेल्या खाणीवाडा - कुडचडे येथील अनिशा केसापूरकर या एक वर्ष वयाच्या बालिकेचा मृतदेह तिच्या राहत्या घराच्या एका कोपऱ्यात कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली आहे.
शुक्रवारी, ८ रोजी अनिशाची आई घरी साडीच्या झोळीत मुलीला ठेवून शेजारी घरकामाला गेली होती. वडीलही सकाळी उठून रोजच्याप्रमाणे कामाला निघून गेले होते. आई घरी परतली असता झोळीत मुलगी नसल्याचे आढळले. त्यामुळे शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या सांगण्यानुसार, तिच्या आईने कुडचडे पोलिस स्थानक गाठले व मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. निरीक्षक निलेश राणे यांनी शोधकामास सुरुवात केली होती. मात्र, अपहरणासंबंधी कोणतेच धागेदोरे हाती लागले नव्हते. मात्र, आज अनिशाचा मृतदेह तिच्याच घरी अडगळीच्या जागी कोपऱ्यात आढळून आल्याने गूढ निर्माण झाले आहे. तिचे वडील अर्जुन हे गेले तीन दिवस पोलिसांसमवेत अनिशाचा शोध घेत होते.
आज सकाळी साडेआठच्या सुमारास आईला आपल्याच घरात मृतदेह असल्याचे आढळून आले. अनिशा बेपत्ता झाली त्याच दिवशी तिने घातलेल्या स्वेटरवरून तिला ती अनिशाच असल्याची खात्री पटली. कुडचडे पोलिसांनी श्र्वानपथक आणून शोध घेतला, पण खुनाबाबत विशेष धागेदोरे हाती लागू शकले नाहीत. श्र्वान "रामा' याने घराच्या चारी बाजूंनी फेरी मारली, पण कोणताच पुरावा आढळला नाही. वास्तविक घटनेची माहिती सकाळी साडे आठ वाजता कुडचडे पोलिसांना मिळाली होती. श्र्वानपथक येण्यास मात्र संध्याकाळचे तीन वाजले.
जेथे ही दुर्घटना घडली, तेथे दाटीवाटीने छोटी छोटी घरे आहेत. गेले तीन दिवस अनिशाचा मृतदेह तेथेच होता की तिचा अन्यत्र खून करून नंतर तो तेथे आणून ठेवला गेला, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. जेथे मृतदेह सापडला तेथेच चूल आहे व अनिशाची आई तेथे काम करत असते. मग तिच्या नजरेस तिचा मृतदेह दोन दिवस कसा पडला नाही, असा प्रश्नही पोलिसांना पडला आहे.
आज संध्याकाळी पाचच्या सुमारास पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवण्यात आला.

No comments: