बॉम्बस्फोटांचा कट दुधसागरला शिजला!
"सिमी'चे अदनान हेच सूत्रधार
पणजी, दि. 10 (प्रतिनिधी) - कळंगुट येथे बॉम्बस्फोट करण्याचा कट "दुधसागर' येथील जंगलात आखण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती हैद्राबाद येथे पकडण्यात आलेल्या लष्करे तोयबाच्या दहशतवाद्याकडून उघड झाली आहे. अयशस्वी ठरलेल्या या संपूर्ण कटाची आखणी हुबळी येथे शेवटच्या वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मोहमद आसीफ ऊर्फ रशिउद्दीन घौस याने केली होती. दोन दिवसांपूर्वी कर्नाटक पोलिसांनी आसीफ याला गोव्यात आणले होते. कर्नाटक पोलिस आता या कटाची संपूर्ण जुळवाजुळव करण्याच्या कामाला लागले आहेत. यावेळी गोव्यात काही धागेदोरे कर्नाटक पोलिसांच्या हाती लागले असले तरी, पोलिसांनी त्या विषयीची कोणतीच माहिती उघड केलेली नाही.
या कटामागील मुख्य सूत्रधार "सिमी'संघटनेचा निमंत्रक अदनान असल्याची माहिती होनाळी येथे अटक केलेल्या दहशतवाद्याने उघड केली आहे. नासीर व आसीफ या दोघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळताच अदनान हा फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस जंगजंग पछाडत आहे. अदनान याने कर्नाटक व गोव्यात साखळी बॉम्बस्फोट करण्याची योजना आखली होती आणि आम्ही फक्त त्याच्या आदेशाचे पालन करीत होतो, अशी माहिती दोघांनी उघड केली आहे. अदनान त्या दिवसापासून भूमिगत झाला आहे.
नासीर याची "लाय डिटेक्टर' मधून चाचणी गेल्यानंतर त्याने अनेक धक्कादायक माहिती उघड केली आहे. अदनान हा अनेक "एके47' रायफल बाळगतो. त्याचे काका बंगळूर येथे सरकारी अधिकारी असल्याने तो अनेकवेळा बंगळूरला ये-जा करत असल्याचे त्याने सांगितले आहे.
दरम्यान, कर्नाटक पोलिसांनी हुबळी येथून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Monday, 11 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment