Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 21 March 2010

'सीआयडी'च्या हाती ठोस पुरावे

अमली पदार्थ प्रकरण
संजय परब फरारी घोषित
अजामीनपात्र वॉरंट जारी
अतालाची कसून चौकशी

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): ड्रग प्रकरणात अटकेत असलेले संशयित पोलिस अधिकारी व शिपायांविरोधात ठोस पुरावे गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) हाती लागले आहेत; तर निलंबित निरीक्षक आशिष शिरोडकर कोणत्या प्रकारे न्यायालयाच्या गोदामात ठेवलेले अमली पदार्थ संशयित अताला याला पुरवत होता, याचा तपास सध्या लावला जात आहे. त्यासाठी उद्या (रविवारी) म्हापसा येथील एका पोलिस उपनिरीक्षकाला आणि पोलिस शिपायाला जबानी देण्याकरता बोलावण्यात आले आहे. दरम्यान, फरारी असलेल्या संजय परब याच्या विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले असून तो कुठेही दिसल्यास त्याला त्वरित अटक करून "सीआयडी'च्या ताब्यात देण्याचे सूचना सर्व पोलिस स्थानकांना देण्यात आली आहे. संजयचा शोध घेण्यासाठी काल पासून अनेक ठिकाणी छापे घालण्यात आल्याचे या प्रकरणाचे तपास अधिकारी चंद्रकांत साळगावकर यांनी सांगितले.
संशयित आरोपी संदीप परब आणि रामचंद्र काणकोणकर ऊर्फ "बिल्डर' यांनी जामिनासाठी "एनडीपीएस' न्यायालयात अर्ज सादर केला असून त्यावर आज युक्तिवाद झाला. बिल्डर याच्या अर्जावर येत्या सोमवारी युक्तिवाद होणार आहे. यावेळी संदीप याचा जामीन अर्जाला विरोध करताना "सीआयडी'ने दावा केला की, संदीप हा मुख्य संशयित आरोपी असल्याने त्याच्याकडून अनेक गोष्टी जप्त करायच्या आहेत. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला जावा. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून या अर्जावरील निवाडा येत्या सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आला.
दरम्यान अताला याची आज पुन्हा एकदा तब्बल दोन तास कसून चौकशी करण्यात आली. कोणत्याच संशयित आरोपींना "व्हिआयपी ट्रीटमेंट' दिली जात नसल्याचे "सीआयडी'च्या सूत्रांनी स्पष्ट केले. या सहाही जणांचे गट पाडून त्यांना दोन ठिकाणच्या पोलिस स्थानकांच्या कोठडीत ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या पोलिस अधिकारी आणि शिपायांच्या विरोधात पंच म्हणून राहण्यास कोणीच तयार नसल्याने अडचण निर्माण झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकारी कर्मचारीही पंच म्हणून राहण्यास विरोध करीत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे अनेक ठिकाणी छापे टाकण्याचे काम रखडल्याचेत्यांनी सांगितले.

No comments: