Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 24 March 2010

अजय कौशलचा संशयास्पद मृत्यू

वास्को, दि. २३ (प्रतिनिधी): ब्रिटनच्या "मोस्ट वॉंटेड' यादीत असलेला आणि सडा उपकारागृहातील पोलिस व कैद्यांसाठी डोकेदुखी ठरलेला अजय कौशल याचा आज कारागृहातून इस्पितळात नेतेवेळी संशयास्पद मृत्यू झाला. कौशल याने विषारी गोळ्यांचे सेवन केल्याचे वृत्त असून शवचिकित्सेनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती सडा तुरुंग अधीक्षक राजेंद्र सातार्डेकर यांनी दिली.
२८ ऑक्टोबर २००९ रोजी मडगावच्या प्रथम श्रेणी न्यायालयाने हस्तांतरण कायद्याखाली अजय कौशल याला न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर त्याला सडा उपकारागृहात ठेवण्यात आले होते. आज (दि. २३) पहाटे २.३० च्या सुमारास कौशल याची प्रकृती बिघडल्याने त्याला १०८ रुग्णवाहिकेतून प्रथम चिखलीच्या कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, कौशल बेशुद्ध अवस्थेत असल्याने व त्याची प्रकृती आणखीन खालावल्याने त्याला गोमेकॉत हालवले जात असता वाटेत त्याचा मृत्यू झाला.
कौशल याने रात्रीच्या वेळी विषारी गोळ्या घेतल्याची माहिती सर्वत्र पसरलेली असली तरी शवचिकित्सेपूर्वी काहीही बोलणे योग्य ठरणार नाही, अशी माहिती तुरुंग अधीक्षक सातार्डेकर यांनी दिली. ज्या कोठडीत अजय कौशल होता तेथे चौकशी व तपासणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यात संशयास्पद काहीच सापडले नसल्याची माहिती साहाय्यक तुरुंग अधीक्षक भानुदास पेडणेकर यांनी दिली. कौशलच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी खास न्यायदंडाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, शवचिकित्सेवेळी ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अधीक्षक सातार्डेकर यांनी दिली.
चिखली कुटीर रुग्णालयाचे प्रमुख अधिकारी डॉ. मेक्सिमियानो डिसा यांनी कारागृहाचे सात - आठ कर्मचारी पहाटे तीनच्या सुमारास कौशल याला घेऊन आल्याचे सांगितले. कौशलची प्रकृती बिघडत असल्याने ड्युटीवर असलेले चिकित्सक डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी त्याला गोमेकॉत नेण्याची सूचना केली.
दरम्यान, कौशलचा मृत्यू कसा झाला याबाबत अजून पर्यंत स्पष्टीकरण झाले नसले तरी त्याच्या मृत्यू मागे गौडबंगाल असल्याचा संशय कौशल याचे वकील ऍड. राजू गोम्स यांनी व्यक्त केला आहे. कौशल एकदम धडधाकट असल्याने या प्रकाराची कसून चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, कौशलच्या इंग्लंडमधील बहिणीला या घटनेची माहिती देण्यात आली असून उद्या त्याच्यावर गोमेकॉत शवचिकित्सा केली जाणार आहे. यानंतरच कौशलच्या मृत्यूचे गूढ उकलणार आहे.
सडा कारागृहात कैदी व पोलिसांना कौशल सतावत असल्याने त्याचा काटा काढण्यासाठी कोणीतरी षड्यंत्र रचले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. किंवा कायम घडणाऱ्या अशा प्रकारांना कंटाळून त्याने आत्महत्या केली असावी, असेही बोलले जात आहे.

No comments: