काणकोण, दि. २४ (प्रतिनिधी)- बेतुल मच्छीमारी धक्क्यापासून ३ किमी अंतरावर खणगिणी पठारावर बेकायदेशीररीत्या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या जुन्या खनिज खाणीवरील प्रकल्पाविरुद्ध स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर कुंकळ्ळी पोलिसांनी कारवाई करून खाण तात्पुरती बंद केली आहे. परंतु, कुंकळ्ळी पोलिस व खाण संचालकांकडून परस्परविरोधी प्रतिक्रिया मिळत असल्याने यामागे मोठे गौडबंगाल असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे खाण सुरू करण्यासाठी एका मंत्र्याच्या मुलाने एका प्रसिद्ध खाण उद्योजकाच्या साह्याने प्रयत्न चालवले असल्याने शासकीय यंत्रणेकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होण्याचा धोका नागरिकांनी वर्तवला आहे.
याविषयी मिळालेल्या सविस्तर वृत्तानुसार नाकेरीजवळ खणगिणी पठारावर असलेली खाण गेल्या ३० वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती. मात्र, आता या जुन्या खाणीवर खोदकाम करण्यास सुरुवात झाली असून सुमारे शंभर ट्रक ये जा करत असल्याने स्थानिकांनी याची धास्ती घेतली. यासंबंधी त्वरित पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. या ठिकाणी खाण सुरू करण्याचा कोणताच परवाना नसल्याने पोलिसांनी कारवाई करून सदर काम बंद पाडले.
या घटनेची माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी ४ मार्च रोजी खाण संचालकांना दिली होती, अशी माहिती कुंकळ्ळीचे निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. सदर ठिकाणी कोणतीच खाण नसून येथील जुन्या खाणीवरील खनिज सुमारे दोन किमी अंतरावर साठवण्यात येत होते, असे निरीक्षक आल्बुकर्क यांनी सांगितले. कुंकळ्ळी पोलिस स्थानकाच्या हद्दीत खाण व्यवसाय सुरू असल्याच्या गोष्टीचे खंडन करताना त्यांनी वरील प्रकार केवळ एकाच दिवसात घडल्याचा हास्यास्पद दावा केला.
दरम्यान, खाण संचालकांनी या संदर्भात तक्रार मिळालेली असली तरी येथे खाण नसल्याचा दावा केला. सदर ठिकाणी टाकाऊ खनिज होते जे काही अज्ञातांनी या जागेवरून हालवण्याचा प्रयत्न केला, आणि हा चोरीचा प्रकार असल्याने आपल्या खात्याअंतर्गत येत असल्यास त्यावर योग्य कारवाई करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या प्रकाराचा शहानिशा करण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने सदर ठिकाणी पाहणी केली असता असे आढळून आले की, खणगिणी येथील या जुन्या खाणीवर जाण्यासाठी एक रस्ता तयार करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी कमी दर्जाचा खनिज माल साठवून ठेवण्यात आला आहे. या जुन्या खाणीवर आधुनिक मशिनरी वापरून खनिज माल उचलण्यात आल्याच्या खुणा या ठिकाणी आढळून आल्या आहेत. याशिवाय आधुनिक पद्धतीच्या जिलेटिनचे स्फोट घडवून आणल्याने त्याची रिकामी खोकी आढळून आली आहेत. सदर खाणीपासून दोन किमी अंतरावर हा माल साठवून ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.
अशा प्रकारच्या बेकायदा खाणी नुवे खोला गवळ येथे सुरू करण्याचे प्रयत्न मध्यंतरी झाले होते मात्र, लोकांच्या विरोधामुळे बंद पाडण्यात आल्या होत्या. खणगिणी येथे खाण सुरू झाल्यास स्थानिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार असून कोणत्याही परिस्थितीत येथे खाण सुरू होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Thursday, 25 March 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment