Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 23 March 2010

अद्याप गुंता कायम!

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): मुंबईतील समन्वय बैठकीला उपस्थित राहून परतलेल्या "जी ७'च्या आमदारांमधील नाराजी आज अनेकांच्या तोंडून उघड झाली. अर्थात यांपैकी कोणीही अधिकृतपणे बोलायला तयार नव्हते. आपल्या "मागण्या'अद्याप मान्य करण्यात आलेल्या नाहीत, असे यांपैकी एका नेत्याने सांगितले. या मागण्या कोणत्या याबद्दल मात्र कोणीही नेता बोलायला तयार नव्हता.
मुंबईत राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक बिनसाळे यांच्याशी संपर्क साधला असता, जी ७ च्या मागण्या कायम असून, त्यावर विधानसभा अधिवेशनानंतर ३१ रोजी मुंबईत बैठकीत सोक्षमोक्ष लावला जाईल, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा अधिवेशनासाठी आपण तातडीने परतलो असल्याचे जी ७ च्या काही नेत्यांनी सांगितले. अर्थविधेयक संमत करण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी केल्यामुळे नाइलाजाने का होईना, या सदस्यांनी विधानसभा कामकाजाला हजेरी लावली. अर्थात आपल्यात कसलेही मतभेद नाहीत, असे चित्र निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले नाहीत. विधानसभा कामकाजात भाग घेतलेले सत्ताधारी आघाडीचे आमदार व मंत्री आज तणावाखाली वावरत असल्याचे जाणवत होते. अर्थविधेयकाला विरोध करू अशी डरकाळी फोडणाऱ्या आमदारांना पक्षश्रेष्ठींनी कामत सरकारचे समर्थन करण्याचा आदेश दिला असला तरी हे नाराज आमदार ३१ च्या बैठकीची प्रतीक्षा करीत असून, अकार्यक्षमता आणि प्रशासनातील ढिलाई यामुळे बदनाम झालेले सरकार यापुढे सत्तेवर ठेवायचे की नाही, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे.

No comments: