Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 21 March 2010

धर्मापूर येथे अपघातात तिघे तरुण जागीच ठार

मडगाव, दि. २० (प्रतिनिधी) : आज पहाटे धर्मापूर येथे माजी आमदार मामू फर्नांडिस यांच्या घराजवळ हमरस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे तरुण ठार झाले. आल्फ्रेड रुझारियो ग्रासीयस (३० नावेली), रिक्सन डायस (२२ शिरवडे नावेली), मेहबूब कांजी (२० सावर्डे कुडचडे) अशी त्यांची नावे आहेत.
ही घटना पहाटे ५.१५ च्या सुमारास घडली. हे तिन्ही तरुण जी ए ०२ इ ०८७० यामाहा मोटरसायकलवरून मडगावच्या दिशेने भरधाव येत होते. त्यांच्या मागोमाग जी ए ०२ यू ६५२२ हा ट्रक काणकोणहून मडगावच्या दिशेने जात होता. भरधाव निघालेल्या या ट्रकची धडक मोटरसायकलला बसली व रिक्सन आणि मेहबूब डोके आपटून जागच्या जागी ठार झाले. आल्फ्रेड गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ बांबोळी येथे "गोमेकॉ' इस्पितळात नेले जात असताना वाटेतच तो मरण पावला. हा अपघात भयंकर होता.
धर्मापूर पुलाजवळ व आकेपासून येणारे हे रस्ते जेथे मिळतात तो भाग म्हणजे
मृत्यूचा सापळा बनला आहे. याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी ट्रकच्या धडकेने ८५ वयाची महिला ठार झाली होती. १५ दिवसांपूर्वी अशाच अपघातात चौघे जखमी झाले होते. गेल्या चार वर्षांत या ठिकाणी वाहन अपघातांमुळे मृत्यूंची संख्या १० पेक्षा अधिक झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने थाटल्याने व वेगावर मर्यादा नसल्याने हे अपघात होत आहेत. या अपघातात ठार झालेले तिघे तरुण एवढ्या पहाटे कोठे गेले होते याबद्दल माहिती मिळाली नाही.
------------------------------------------------------------------
भयावह दृश्य
अपघात झाला तेथील दृश्य अंगावर काटे यावे असेच दिसत होते. रस्त्यावर रक्ताने माखलेले व चेंदामेंदा झालेले देह पडले होते. ते पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. मोटरसायकलची अवस्थाही तशीच झाली होती. पहाटेची वेळ असूनही कित्येक लोक मदत करण्यासाठी तेथे येऊन पोहोचले. त्यांनी आपल्यापरीने होईल तेवढी मदत केली. मात्र या भयंकर अपघातातील कोणालाही ते वाचवू शकले नाहीत. निष्काळजीपणे वाहन हाकून प्राणहानीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचा चालक अशोक विष्णू वेळीप याला अटक केली झाली आहे.

No comments: