५० लाखांचे नुकसान
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): सांत इनेज येथील एस. बी. च्यारी यांच्या गॅरेजला मध्यरात्री लागलेल्या आगीत सुमारे पन्नास लाखांचे नुकसान झाले असून यात ४ चारचाकी गाड्या, ५ दुचाक्या जळून खाक झाल्या. ही आग कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. रामनवमी असल्याने गॅरेज बंद ठेवण्यात आली होती व सर्व मूळ गावी निघून गेले होते. या दरम्यान मध्यरात्री अचानक गॅरेजने पेट घेतल्याने त्याठिकाणी दुरुस्ती कामासाठी ठेवण्यात आलेल्या वाहनांनी पेट घेतला. यात टाटा इंडिका (जीए ०१ सी ५१६८), मारुती ८०० (जी ०१ डी ९११७), फियाट ऊनो (जीए ०१ एन ००७७) आणि ह्युंदाय गेट्झ (जीए ०६ ए ८५६७) या चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या तर, एक एलएमएल व्हेस्पा (जीए ०१ डी ९११७), हिरो होंडा स्प्लेंडर (जीए ०१ के ९६१७), हिरो होंडा पॅशन आणि दोन बजाज पल्सर आगीच्या विळख्यात सापडल्या.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याठिकाणी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुमारे एका तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यास त्यांना यश आले. गॅरेजच्या बाजूलाच च्यारी यांचे घर असून त्यालाही आग लागल्याने बरेच नुकसान झाले आहे. घरात ठेवण्यात आलेले सोने, महत्त्वाची कागदपत्रे आणि फर्निचर जळाल्याचीही माहिती यावेळी अग्निशमन दलाने दिली.
गॅरेजमध्ये उपयोगी येणारे सर्व साहित्य त्याठिकणी होते. तसेच पेंट मारण्यासाठी वापरण्यात येणारे टर्पेंटाइन आणि पेट्रोलही याठिकाणी ठेवण्यात आले होते, अशी माहिती पणजी पोलिसांनी दिली. परंतु, अचानक आगीने पेट कसा घेतला याची चौकशी अग्निशमन दल करीत आहे.
Friday, 26 March 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment