पर्रीकर यांची घोषणा
फोंडा, दि.२० (प्रतिनिधी): एखाद्या प्रकल्पाला गावातील लोकांकडून विरोध होत असल्यास तो प्रकल्प होता कामा नये. विजार पंचवाडी येथील नियोजित विजर खाजन बंदर (जेटी) प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांबरोबर राहून भाजपने त्या प्रकल्पाला विरोध करण्याचा संकल्प केला आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी विजार पंचवाडी येथे आज (दि.२०) संध्याकाळी केले. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधकांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे.
सेझा गोवाच्या खाजन बंदर आणि रस्ता प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पंचवाडी बचाव समितीतर्फे श्री सातेरी भगवती देवस्थानच्या सभागृहात आयोजित सभेत श्री. पर्रीकर बोलत होते. या वेळी आमदार महादेव नाईक, फादर लॉरेन्स रॉड्रिगीस, पंचवाडीच्या पंच सदस्य लीना डिकॉस्टा, केशव नाईक, देवस्थान समितीचे अध्यक्ष सोनू कामत यांचे पुत्र सतीश कामत, संतोष कामत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
खाण प्रकल्प कधीच चांगला असू शकत नाही. पंचवाडी येथील नियोजित खाजन बंदर प्रकल्प म्हणजे मोठा घोटाळा असून विधानसभेत या प्रश्नावर आवाज उठविण्यात येणार आहे. दिगास पंचवाडी येथे मायनिंग जेटी कार्यरत आहे. त्याठिकाणी लोकांना त्रास सहन करावा लागतो. मग पंचवाडी गावात आणखी नवीन जेटी उभारण्याचे प्रयोजन काय? दिगास येथेच नियोजित मायनिंग रस्ता जोडल्यास लोकांना त्रास होणार नाही. गावातील शेती, कुळागरे नष्ट करून प्रकल्प उभारणे घातक आहे. पंचवाडी गावातील काही लोकांची दिशाभूल करून त्यांना मायनिंग प्रकल्पाच्या बाजूने ओढण्यात आले आहेत. "त्या' लोकांना परिस्थिती समजावून सांगून त्यांनाही खाणविरोधी चळवळीत सहभागी करून घेण्याची गरज आहे, असे श्री. पर्रीकर यांनी सांगितले.
मायनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळू लागल्याने बेशिस्त वाढली आहे. स्वार्थी वृत्तीमुळे या व्यवसायाला ताळतंत्र उरलेला नाही. सेझासाठी राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पात अनेक घोटाळे असून वेळोवेळी त्या घोटाळ्यांना वाचा फोडण्यात येणार आहे, असेही श्री. पर्रीकर म्हणाले.
स्थानिक आमदार महादेव नाईक यांनी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांना पूर्ण पाठिंबा असल्याचे घोषित केले. पंचवाडी गावातील सर्वांनी दोन वर्षापूर्वी या मायनिंग प्रकल्पाला दोन वर्षापूर्वी कडाडून विरोध केला होता. मग आता या प्रकल्पाचे काही जणांकडून समर्थन का केले जात आहे, असा प्रश्नत्यांनी उपस्थित केला. सदर प्रकल्पात एका माजी आमदाराचा हात असल्याचा आरोपही आमदार श्री. नाईक यांनी केला.
गावातील पर्यावरणाचा, शेतीची नासधूस करून मायनिंग प्रकल्प राबविण्यास सक्त विरोध केला जाणार आहे. या प्रकल्पाचे समर्थन करण्यासाठी लोकांना आमिषे दाखविण्यात येत आहेत काही जणांना नोकऱ्या देण्याचे आमिष दाखविले जात आहे. आत्तापर्यंत मायनिंगवाल्यांनी या गावातील किती जणांना नोकऱ्या दिल्या आहेत. गावातील लोक व गावाचे हिताची जोपासना करण्याची गरज आहे, असे आमदार श्री. नाईक यांनी सांगितले.
पंचवाडी गावाच्या हितासाठी मायनिंग प्रकल्पाला विरोध करण्याची गरज आहे, असे फादर लॉरेन्स यांनी सांगितले. पंचवाडी गावातील बहुसंख्य लोकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे गावातील लोकांनी एकजुटीने सदर प्रकल्पाला विरोध करण्याचे काम करावे, असे आवाहन फादर लॉरेन्स यांनी केले.
गावाच्या हिताचा विचार करण्याचा अधिकार लोकांचा असून लोकांनी या प्रकल्पाबाबत निर्णय घेतला पाहिजे, असे पंच केशव नाईक यांनी सांगितले. मायनिंग प्रकल्प हा पंचवाडी गावावर आलेले मोठे संकट असून हे संकट दूर करण्यासाठी लोकांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे. मायनिंग प्रकल्प राबविण्यास पुढे आलेल्यांना लोकांना होणाऱ्या त्रासाची चिंता नाही, असे पंच सदस्य लीना डिकॉस्टा यांनी सांगितले.
व्हिसेंट फर्नांडिस यांनी प्रास्ताविक केले. क्रेसी डिसोझा यांनी सूत्रसंचालन केले. बचाव समितीचे श्री. दुर्गेश यांनी आभार मानले. यावेळी पंचवाडी बचाव समितीचे ख्रिस्तेव डिकॉस्टा, जुझे डिकॉस्टा, प्रकाश गावकर, नाझारेथ गुदिन्हो व ग्रामस्थ उपस्थित होते.
Sunday, 21 March 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment