काठमांडू, दि. २० : तब्बल पाच वेळा नेपाळचे पंतप्रधानपद भूषवलेले आणि अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व लाभलेले ज्येष्ठ नेते गिरिजाप्रसाद कोईराला (८५) यांचे आज येथे स्थानिक वेळेनुसार १२.१० च्या सुमारास निधन झाले. नेपाळमधील २४० वर्षांची राजेशाही संपवून त्या देशाला प्रजासत्ताक बनवण्याच्या प्रक्रियेत कोईराला यांचा सिंहाचा वाटा होता. आता रसिकांच्या विस्मृतीत गेलेली अभिनेत्री मनीषा कोईराला हिचे ते काका होते.
दीर्घकाळ ते आजारी होते. अतिसार व डांग्या खोकला यामुळे काल त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यातच त्यांची फुफ्फुसे निकामी झाली होती. नेपाळच्या उपपंतप्रधान व आपली कन्या सुजाता कोईराला यांच्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. नेपाळी कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेल्या कोईराला यांच्या निधनामुळे साऱ्या देशावर शोककळा पसरली आहे. नेपाळमधील सत्तारुढ आघाडीत हा पक्ष सध्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. माओवाद्यांशी शांतता बोलणी करण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांनी भारताशी जुळवून घेण्यावर विशेष भर दिला होता. सुमारे सहा फूट उंची, लोभस मुद्रा आणि शिडशिडीत अंगकाठी यामुळे पहिल्या भेटीतच त्यांची समोरच्या व्यक्तीवर जबरदस्त छाप पडत असे. त्यांच्या मृत्युने नेपाळच्या राष्ट्रीय राजकारणात जबरदस्त पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यावर उद्या (रविवारी) शाही इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Sunday, 21 March 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment