कॅरोलिना पुन्हा महापौर व पारेख उपमहापौर
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): "गुप्त पद्धतीद्वारे मतदान घ्या,' ही मागणी फेटाळून पणजी महापौरांची निवड हात उंचावून करण्याचा निर्णय घेतला गेल्याने विरोधी गटाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकून सभात्याग केला. त्यामुळे कॅरोलिना पो यांची महापौरपदी तर, यतीन पारेख यांची उपमहापौरपदी पुन्हा एकदा एका वर्षासाठी निवड झाली. याविषयीची घोषणा पालिका आयुक्त तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी एल्विस गोम्स यांनी केली.
महापौर व उपमहापौरपदाचा कार्यकाळ संपत असल्याने आज सकाळी या दोन्ही पदांसाठी नव्याने निवडणूक होणार होती व ती कोणत्या प्रकारे होणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.
निवड प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी विरोधी गटाने निवडणूक गुप्त मतदानाद्वारे घेतली जावी, अशी मागणी लावून धरली. तथापि, निर्वाचन अधिकारी गोम्स यांनी महापौरांची निवड कशी केली जावी, याबद्दल कोणतेही नियम नसल्याने सभागृहाच्या मागणीनुसार ती आपण घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी लगेच मतदान घेतले. सत्ताधारी गटाने गेल्या काही वर्षांपासून जी पद्धत अवलंबली जाते त्यानुसार ही निवड व्हावी, अशी विनंती केली. त्याबरोबर विरोधी गटाने या निवड प्रक्रियेला जबरदस्त विरोध करीत सभात्याग केला.
गेल्या दहा दिवसांपूर्वी विरोधी गटाने निवेदन सादर करून महापौर आणि उपमहापौरपदाची निवड प्रक्रिया गुप्त मतदानाद्वारे केली जावी, अशी मागणी केली होती. त्यावर कोणताही निर्णय न घेता हात उंचावूनच ही निवड प्रक्रिया केल्याने आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे विरोधी गटाचे प्रमुख मिनीन डीक्रूज यांनी सांगितले.
निवड झाल्यानंतर नवनियुक्त महापौर कारोलिना पो म्हणाल्यात की, गेल्या वर्षी कचरा समस्या आणि आर्थिक तुटवडा हे दोन गंभीर प्रश्न माझ्यासमोर होते. सध्या आर्थिक स्थिती सुधारत असून कचऱ्याच्या समस्येवरही तोडगा काढला जाईल. यावेळी पालिकेच्या स्थायी समितीवरील सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे त्यात विरोधी गटाच्या सदस्यांना स्थान देण्यात आलेले नाही.
Sunday, 21 March 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment