विधानसभेत मामी पुन्हा आक्रमक
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकाला मान्यता मिळाली आहे, त्याबद्दल केवळ भाषणे ठोकू नका. गोव्याच्या विधानसभेत मी एकटी महिला आहे. या महिलेला तुम्ही किती न्याय दिला. हिंमत असेल तर मला "कॅबिनेट' दर्जा द्या, असे थेट आव्हान आज सांताक्रुझच्या आमदार तथा विधानसभेतील एकमेव महिला सदस्य व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी आपल्याच सरकारला दिले.
सभापती प्रतापसिंह राणे यांनी महिला विधेयकाला आरक्षण देण्याच्या विधेयकाला राज्यसभेत मान्यता मिळाल्याने राज्यसभेच्या सदस्यांचे अभिनंदन करण्याचा ठरावा मांडला होता. त्याला अनुमोदन देण्यासाठी उपसभापती माविन गुदिन्हो यांनी टिपेच्या स्वरात महिलेवर अन्याय होता कामा नये, असे उद्गार काढले. महिलांना पुढे येण्यासाठी वाव मिळाला पाहिजे. भविष्यात गोव्याच्या विधानसभेत १३ महिला आमदार बनून येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशा आशयाचे भाषण ऐकून सद्गदित झालेल्या "मामीं'नी उभे राहून चौफेर हल्लाबोलच केला.
"भाषणे ठोकून गप्प बसू नका. राज्यसभेत ते विधेयक संमत होणार. मी येथे एकटीच महिला आहे ना? मग मला का कॅबिनेट दर्जा दिला जात नाही? माझ्यावर का अन्याय केला जातो? हिंमत असेल तर मला कॅबिनेट दर्जा द्या", असे उद्गार भावनाविवश झालेल्या मामींनी काढले.
येथे खेळण्यासाठी मुलांना मैदान नाही. बॅट-बॉल नाही. प्रशिक्षक द्या म्हणून मागितले तर, पैसे नाही म्हणून सांगितले जाते. भाषणे ठोकून चालणार नाहीत. गोव्यात सचिन तेंडुलकरसारखे होण्याच्या लायकीचे अनेक खेळाडू आहेत. त्यांना प्रोत्साहन द्या. "पैसे नाहीत, पैसे नाही' असे म्हणत रडत बसू नका, असाही टोलाही मामींनी शेवटी लगावला.
Tuesday, 23 March 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment