Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 23 March 2010

पोलिस कॉन्स्टेबलसह सातजणांना अटक

मारहाण-जाळपोळप्रकरणी
डिचोली, दि. २२ (प्रतिनिधी): पूर्ववैमनस्यातून वसंतनगर साखळी येथील सिद्धेश काणेकर या युवकाला मारहाण करून साखळी बसस्थानकावरील एक दुकान व बाहेरील चार लहान गाडे जाळल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी आज एका पोलिस कॉन्स्टेबलसह सहाजणांना अटक केली. अटक करण्यात आलेले सातहीजण कुडणे येथील असून त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी यासंदर्भात दोन स्कॉर्पियो वाहने जप्त केली आहे.
डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास सिद्धेश काणेकर या युवकाला कारापूर तिस्क येथे बेदम मारहाण करण्यात आली. या जीए ०४ सी ०९७९ व जीए ०४ सी १३३५ क्रमांकांच्या स्कॉर्पियोमधून आलेल्या विश्राम मळीक (३०), प्रसाद परब (२४), गोपी मळीक (२४), विराज मळीक (२३), विठू मळीक (२१), सुरज देगवेकर (२४), सत्यप्रकाश परब (२७) हे कुडणे येथील सात जणांनी मारहाण केली. यानंतर जीए ०४ सी ०९७९ वाहनातील काही जण साखळी बसस्थानकावर गेले आणि त्यांनी एक दुकान व चार गाड्यांना आग लावली. या आगीत गाडे जळून खाक झाले, पैकी अनिल काणेकर यांचे अडीच लाखांचे नुकसान झाले. राजेंद्र गवंडी, छोटेलाल, यसीन शेख, रमेश सावंत यांचे प्रत्येकी १० हजारांचे नुकसान झाले.
सदर प्रकरणाची माहिती मिळताच त्याची गंभीर दखल घेत साखळीवासीयांनी आज सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ रास्तारोको करून संशयित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. नगराध्यक्ष सुनिता वेरेकर यांच्यासह इतर नगरसेवक व नागरिक यावेळी उपस्थित होते. जमावाने सुमारे तीन तास वाहतूक रोखून धरल्याने अनेक वाहने अडकून पडली होती.
यावेळी पोलिस निरीक्षक हरीष मडकईकर पोलिस फौजफाट्यासह दाखल झाले असता संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाचारण करण्याची मागणी केली. निरीक्षक मडकईकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.
पोलिसांनी यानंतर सातही जणांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. यांपैकी विश्राम मळीक हा पोलिस कॉन्स्टेबल असून सुरक्षा रक्षक शाखेत आहे. वरील सातही जणांविरुद्ध मारहाण व आग लावण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सर्वांना उद्या न्यायालयात सादर केले जाणार आहे.

No comments: