"तोयबा'विरुद्ध कारवाईसही हिरवा कंदील
इस्लामाबाद, दि. ७ - येत्या ४८ तासांत लष्कर ए तोयबाविरुद्ध कडक कारवाईची योजना आखण्यास व तिघा कडव्या अतिरेक्यांना अटक करण्यास पाकिस्तानने मान्यता दिली आहे. मुंबईवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत आधी नकारात्मक भाषा करणारा पाकिस्तान आता सुतासारखा सरळ येऊ लागला आहे.
कारण यासंदर्भात अमेरिका व भारताने त्या देशावर आणलेल्या दबावाची मात्रा आता चांगलीच लागू पडली आहे. अमेरिकेतील "वॉशिंग्टन पोस्ट' या ख्यातनाम दैनिकाने हे वृत्त पाकिस्तानी लष्करातील एका उच्चाधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्यांना पाकिस्तानच जबाबदार असून त्याविषयीचे ठोस पुरावे आमच्याकडे असल्याचा दावा भारताने केला होता. तसेच १८ कडव्या अतिरेक्यांना आमच्या ताब्यात द्या, अशी आग्रही मागणी भारताने पाकपुढे ठेवली आहे. त्यामध्ये लष्कर ए तोयबाचा कमांडर झाकी उर रेहमान लखवी, इंटर सर्व्हिसेस इंटिलीजन्सचा माजी प्रमुख हमीद गुल यांचा प्रामुख्याने समावेश आहे. आता अमेरिकेनेच कडक शब्दांत समज दिल्यावर पाकिस्तानची पाचावर धारण बसली आहे. भारताने मागणी केलेल्या अतिरेक्यांना बऱ्या बोलाने भारताच्या स्वाधीन करा, असा गर्भित इशाराच अमेरिकेकडून मिळाल्याने आधी मोठ्या तोऱ्यात भारताची मागणी फेटाळणारे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचा सूरच बदलला आहे. त्यामुळे आगामी ४८ तास पाकिस्तानातील लष्कर व सत्ताधारी यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. सुमारे दोनशे जणांचे बळी घेणारे मुंबईवरील हल्ले पाकिस्तानातील लष्कर ए तोयबानेच घडवून आणल्याचे ठोस पुरावे भारताने अमेरिकेलाही दाखवून दिले आहे. त्यामुळे अमेरिकेचीही पाकच्या या दुष्कृत्यांबद्दल खात्री पटली आहे. या हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार युसुफ मुझम्मिल नावाचा लष्कर ए तोयबाचा कमांडर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानेच काही युवकांना हेरून दहशतवादाचे खास प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय दडपणही वाढत चालले आहे. युरोपीय देशांनी तर पाक म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच शांतताप्रेमी देशांची डोकेदुखी ठरल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडोलिसा राईस यांनी युसुफसह भारताने मागणी केलेले सर्व अतिरेकी त्वरित भारताच्या ताब्यात द्यावेत, असा जणू सक्त आदेशच पाकिस्तानला दिले आहे. त्यामुळे नाक दाबले की, तोंड उघडते याची प्रचीती सध्या पाकिस्तान घेत आहे.
Monday, 8 December 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment