Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 12 December 2008

बाजार संकुलाची जागा "बिल्डर'च्या घशात?

केपे पालिका बैठकीत आज खडाजंगीचे संकेत

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) - केपे पालिका मंडळाने बाजार संकुलासाठी निश्चित केलेली जागा मंडळाच्या काही सत्ताधारी सदस्यांकडून एका खाजगी बिल्डरला लाटण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. या प्रस्तावासाठी मोठा "सौदा' झाल्याची जोरदार चर्चा सध्या त्या परिसरात सुरू असून उद्या १२ रोजी होणाऱ्या पालिका मंडळ बैठकीत यावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
प्राप्त माहितीनुसार केपे पालिका मंडळाने २००३ साली येथील सर्व्हे क्रमांक १७०/२ ते १७०/२४ व १६९ चा काही भाग बाजार संकुलासाठी निश्चित करण्याचा ठराव संमत करून तसा प्रस्ताव नगर नियोजन खात्याकडे पाठवण्यात आला होता. नगर नियोजन खात्याने हा प्रस्ताव मान्य करून सर्व्हे क्रमांक १६९ चा भाग त्यातून वगळला व १७०/२ ते १७०/२४ ची जमीन बाजार संकुलासाठी वापरण्यास "ना हरकत' दाखला मंजूर केला. नगर नियोजन खात्याच्या या दाखल्यानंतर भूखंड संपादन सुरू करण्यासाठी पालिकेने सर्व सोपस्कार पूर्ण करून फाईल तयार केली. तथापि, ती संबंधित खात्याकडे सोपवण्यात आली नाही.पालिकेने बाजार संकुलासाठी निश्चित केलेली हीच जागा आता एका खाजगी बिल्डरने आपल्या नावावर केली असून पंचायतीने आपला ठराव मागे घ्यावा यासाठी सदर बिल्डरकडून बरेच प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. बिल्डरने चालवलेल्या प्रयत्नांना काही अंशी यश मिळण्याची शक्यता असून पालिकेच्या काही लोकांकडून एक बडा "प्रस्ताव' बिल्डरला दिल्याचे केपे भागात चर्चिले जात आहे. याप्रकरणी माजी नगराध्यक्ष मॅन्युअल कुलासो यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीला पुष्टी दिली व या प्रस्तावाला आपण विरोध करणार असल्याचे सांगितले. उद्या १२ रोजी पालिका मंडळाची बैठक असून या बैठकीत पालिकेने यापूर्वी घेतलेला ठराव रद्द करण्यासंबंधीचा विषय चर्चेला येणार असल्याचेही ते म्हणाले.
याप्रकरणी पालिकेचे माजी नगरसेवक अजय परेरा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिकेकडून एखाद्या सार्वजनिक प्रकल्पासाठी जागा घेण्याचा ठराव घेऊन त्यानंतर सदर जागा खाजगी बिल्डरला देण्याचा सपाटाच चालवल्याचा आरोप केला.यापूर्वी १९९६ साली असाच बाजार संकुलासाठी एक ठराव घेण्यात आला व कालांतराने या प्रकल्पासाठीची जागा एका "डेव्हलपर'ला विकण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.या व्यवहारात काही राजकीय नेतेही भागीदार असल्याचा संशयही परेरा यांनी व्यक्त केला.
दरम्यान, येथील अनेक भूखंडाने कुळांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी या जागा सार्वजनिक प्रकल्पासाठी वापरण्याचे ठराव पालिका बैठकीत घेऊन त्यानंतर या जागा खाजगी बिल्डरांच्या घशात घालून आपले उखळ पांढरे करण्याचा सपाटाच पालिकेकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. सध्याचे हे प्रकरण बरेच चिघळण्याची शक्यता असून पालिकेचा पूर्वीचा ठराव व नगर नियोजन खात्याने दिलेला "ना हरकत दाखला' सध्या "त्या' बिल्डरसाठी अडथळा बनला आहे. तो दूर करण्यासाठी त्याने चालवलेल्या प्रयत्नांना पालिका बळी पडते की विरोधकांकडून हा डाव उधळला जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.

No comments: