Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 12 December 2008

मडगावात धाडसी चोरी; ३ लाखांचे दागिने पळवले

मडगाव, दि. ११ (प्रतिनिधी) - मडगावात पुन्हा चोरट्यांच्या एका टोळीने येथील एका सुवर्णकाराला आज भरदिवसा सुमारे तीन लाख रुपयांच्या सुवर्णअलंकारांना गंडा घातला. या टोळीत एका महिलेचाही समावेश असावा आणि ही टोळी दाक्षिणात्य असावी असा संशय आहे.
सकाळी १०-३० ते ११-३० दरम्यान येथील लीली गार्मेंटस या कापड दुकानामागील आळीत असलेल्या "वसंतराव ज्युवेलर्स' या दुकानात हा प्रकार घडला तेव्हा दुकानात स्वतः वसंतराव लोटलीकर होते. त्यावेळी दोघे इसम आत आले व त्यांनी वसंतराव यांना दागिन्यांबाबत चौकशी करत बोलण्यात गुंगवून ठेवले. ते बोलत असतानाच आणखी दोघे आत आले त्यानंतर एक महिलाही दुकानात आली. ती दुकानातील वस्तू न्याहाळत राहिली. सुरवातीला आलेल्या लोकांशी बोलण्यात लोटलीकर गुंग असल्याचे पाहून दुसऱ्या बाजूने काऊंटरच्या आत येऊन तिने सोन्याचे हार असलेला संपूर्ण ट्रे उचलून पोबारा केला.
ट्रे नेताना त्यातील एक अंगठी खाली पडली तेव्हा घडलेला प्रकार दुकानदाराच्या लक्षात आला. त्याने आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत ते दोघे पसार झाले होते. सर्वत्र एकच गडबड उडाली. त्यात हे दोघे व ती महिला कधी पळाले ते कुणालाच कळले नाही. नंतर पोलिसांना कळवल्यावर त्यांनी येऊन पंचनामा केला व तपास सुरू केला; पण सायंकाळपर्यंत कोणताच धागादोरा हाती लागला नव्हता.
वसंतराव यांचे पुत्र सतीश यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी सुमारे २५० ग्रॅम वजनाचे दागिने पळविले व त्यांची किंमत साधारणपणे ३ लाख आहे. वसंतराव यांच्या कयासानुसार आरोपी हे दाक्षिणात्य असावेत, कारण त्यांची वेशभूषा त्याच पद्धतीची होती सदर प्रकार घडला त्यावेळी दुकानांत आलेली महिला त्यांच्यापैकीच असावी की काय याबद्दल सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान भाजयुमोचे नेते रूपेश महात्मे यांनी सदर चोरी ही पोलिस खात्यासाठी शरमेची बाब असल्याचे म्हटले आहे. सदर चोरीचा प्रकार घडला तेथून २०० मी. अंतरावर गृहमंत्री रवी नाईक, सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी व द. गोव्यांतील पोलिस कर्मचारी एकत्र आलेले असताना हा प्रकार घडावा यावरुन चोरांना पोलिसांचा काहीच धाक राहिलेला नाही हेच सिद्ध होत आहे असे नमूद करून याची गंभीर दखल घेण्याची वेळ आलेली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
पोलिसांसाठी आव्हान
दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला तेथून अवघ्या २०० मीटरवरील लिंगायत सभागृहात दक्षिण गोव्यातील बीट पोलिसांची बैठक सुरू होती. तेथे स्वतः गृहमंत्री रवी नाईक, वरिष्ठ पोलिस अधीक्षक श्री. चौधरी, ऍलन डिसा व वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. मुख्य रस्त्यावरही या बैठकीनिमित्ताने कडक पोलिस बंदोबस्त होता. तरीसुद्धा ही चोरी झालीच. या चोरीबाबत नंतर पत्रकारांनी गृहमंत्री रवी नाईक यांना छेडले असता, दुकानात इतक्या मौल्यवान वस्तू असतात तेव्हा संबंधितांनी केवळ पोलिसांवर विसंबून चालणार नाही. आपली स्वतःची सुरक्षाव्यवस्था करायला हवी. सरकार प्रत्येक दुकानाला कशी सुरक्षा पुरविणार, असा सवाल त्यांनी केला.

No comments: