लंडन, दि. १० : मुळ भारतीय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांची ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉडर्सच्या उप-सभापतिपदी नियुक्ती झ्राली आहे. असा सन्मान मिळविणारे ते पहिलेच आशियाई व्यक्ती आहेत.
मुळ भारतीय परंतु इंग्लंडचे नागरिकत्त्व मिळविणाऱ्या काही लोकांनी यापूर्वी इंग्लंडच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविले आहे. परंतु, पॉल हे ब्रिटनच्या संसदेत उप-सभापतिपद विराजमान होण्याचा सन्मान पटकावणारे पहिलेच भारतीय असल्यामुळे त्यांच्या या नियुक्तीला ऐतिहासिक समजले जात आहे. नियुक्तीच्या घोषणेनंतर मी गौरवान्वित झालो अशा शब्दांत पॉल यांनी प्रतिक्रिया दिली.
मी एका स्वातंत्र्य सेनानी कुटुंबातून असल्यामुळे महात्मा गांधींनी दिलेल्या "स्वराज्या'च्या घोषणेवरून माझे नाव स्वराज ठेवण्यात आले होते. त्यामुळे हा माझा व भारताचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया मंगळवारी रात्री बहुराष्ट्रीय कंपनी कपारो समुहाचे संस्थापक लॉर्ड पॉल यांनी दिली.
मूळ भारतीय व्यक्तीची इंग्लंडच्या संसदेच्या एका सभागृहाच्या उपसभापतिपदी नियुक्ती होणे ही त्यांच्या लोकशाहीची महानता आहे. कारण ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉडर्सचे अध्यक्षपद सभापती किंवा उपसभापती भूषवित असतात. तसेच सभागृहातील सर्वात उंचीवर असलेल्या खुर्चीत ते विराजमान होतात अशी माहिती स्वराज यांनी दिली.
१९९६ मध्ये पीयरेज आणि १९८३ मध्ये भारताच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार पटकावणाऱ्या ७७ वर्षीय पॉल यांना ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या मूळ भारतीय वंशाच्या उद्योजकांमध्ये विशेष सन्मान प्राप्त आहे. त्यांची पोलाद आणि इंजिनिअरिंग कंपनी कपारोचा वार्षिक कारभार दीड अब्ज पाउंड्स आहे.
Thursday, 11 December 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment