तपपूर्तीनिमित्त दिग्गज कलाकारांची उपस्थिती
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)- पेडणे तालुक्यातील पार्से गावचे सुपुत्र तथा एक अवलिया व्हायोलीनवादक कै. श्रीधर पार्सेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ साजरा करण्यात येणाऱ्या संगीत संमेलनाचे यंदाचे तपपूर्तीचे वर्ष आहे. यंदा हा संगीत समारोह मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. येत्या २४ व २५ जानेवारी २००९ रोजी पार्से येथील श्री देवी भगवती देवस्थान पटांगणात होणाऱ्या या संमेलनात पंडित अजय पोहनकर व श्रुती सडोलीकर यांच्या सुश्राव्य गायनाबरोबर राजेंद्र भावे यांच्या व्हायोलीन वादनाचा आनंद रसिकांना प्राप्त होणार आहे. स्थानिक कलाकारांनाही आपली कला पेश करण्याची संधीही आयोजकांनी प्राप्त करून दिली आहे.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष गणपत कळंगुटकर यांनी ही माहिती दिली. यावेळी अशोक देसाई, उल्हास पार्सेकर व प्रसिद्ध नेपथ्यकार बाबा पार्सेकर आदी समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वर्षी बाराव्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या या संमेलनाची सुरुवात काहीशी अनपेक्षितपणे झाली. मुंबईतील तत्कालीन संगीत वर्तुळात कै. पार्सेकर हे एक अवलिया व इश्वरदत्त प्रतिभा असलेले व्हायोलीन वादक म्हणून प्रसिद्ध होते. तरी गोव्यासाठी ते काहीसे अपरिचितच होते. ते केवळ व्हायोलीनवादकच नव्हे तर उत्तम गायक व तबलावादकही होते,अशी माहिती यावेळी श्री. कळंगुटकर यांनी दिली. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या दर्दी संगीततज्ज्ञानेही त्यांची दखल आपल्या साहित्यात घेतली आहे. १९८८ साली नागपूरचे श्री. विष्णूपंत कावळे हे टेलिफोन निरीक्षक म्हणून वास्कोला बदली होऊन आले. ते स्वतः उत्तम व्हायोलीन वादक होते व श्रीधर पार्सेकरांना ते गुरुस्थानी मानत. यावेळी त्यांनी उद्योजक व रंगकर्मी परेश जोशी यांचा संदर्भ घेऊन पार्से गावचे माजी सरपंच असलेल्या श्री. कळंगुटकर यांची भेट घेतली व त्यांच्या कीर्तीचा परिचय करून देत इथे त्यांच्या गावात संमेलन भरवण्याची विनंती केली. शेवटी अथक प्रयत्नाने व परेश जोशी यांच्या प्रोत्साहनाने हा योग जुळून आला. जोश्यांनी संमेलनासाठी आर्थिक साहाय्याबरोबर संमेलन यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि १९९८ साली पहिले श्रीधर पार्सेकर संगीत संमेलन पार्से या त्यांच्या मूळ गावी भरवण्यात आले.
या संमेलनासाठी डॉ. अजय वैद्य, विनायक खेडेकर, डॉ. विजय थळी, नितीन कोरगावकर आदींनी समितीला बरीच मदत केल्याचे श्री. कळंगुटकर यांनी यावेळी सांगितले. गेली पाच वर्षे या संमेलनाला सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळत असल्याचे सांगून कला व सांस्कृतिक खात्याकडून फार मोठा मदतीचा हात देण्यात येतो,असेही त्यांनी सांगितले. गेल्या अकरा वर्षांत मुंबई, पुणे, बंगलोर, धारवाड, भोपाळ इ. शहरांतील अनेक नामवंत कलाकारांसोबतच अनेक गोमंतकीय कलाकारांनाही आपली गायनकला या संमेलनात पेश करण्याची संधी प्राप्त झाली. यात सरोद, सतार, बासरी, व्हायोलीन वादनाचेही अनेक कार्यक्रम सादर झालेले आहेत. या संमेलनाच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांचा सत्कारही झालेला आहे. पद्मश्री प्रसाद सावकार, पं. प्रभाकर च्यारी, माधव पंडित, कै. पं. मारुती कुर्डीकर, पं. कमलाकर नाईक, आदी २५ - ३० कलाकारांचा समावेश आहे.
Saturday, 13 December 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment