
वास्को, दि. १२ (प्रतिनिधी)- दत्तवाडी संस्थान ओरुले येथे नव्याने उभारण्यात आलेल्या दत्त मंदिरात आज दुपारी प.पू.श्री. वामनाश्रम स्वामीजींच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची तसेच शिखरकलशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. शेकडो भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रींचा तसेच स्वामीजींच्या कृपाशीर्वादाचा लाभ घेतला.
ओरुले येथील नूतन मंदिराच्या शिखरकलश व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सकाळपासून विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. हळदीपूर कर्नाटक येथील प.पू.श्री. वामनाश्रम स्वामीजींचे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी दत्त महाराजांच्या मूर्तीची स्वामीजींच्या हस्ते प्रतिष्ठापना होऊन १२.४० वाजता शिखरकलश प्रतिष्ठापनेचे विधी पूर्ण करण्यात आले. उद्योजक नारायण (नाना) बांदेकर यांनी यजमानपद भूषवले. यानंतर महापूजा, क्षेत्रपाल बलिदान, पूर्णाहुती, अवभृतस्नान, विभूतीवंदन, महामंगलारती, सामूहिक गाऱ्हाणे झाल्यानंतर उपस्थित शेकडो भाविकांनी महानैवेद्याचा लाभ घेतला. याच दरम्यान स्वामीजींच्या पाद्यपूजेचा कार्यक्रम संपन्न झाला.
संध्याकाळी ५ वाजता दत्तजन्म, पाळणा, आरती व मंत्रपुष्पांजली वाहण्यात आली. दत्तजयंती साजरी केल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता नामवंत भजनी कलाकारांनी वातावरण भक्तिमय करून सोडले.
या सोहळ्याला महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा, मुरगावचे आमदार मिलिंद नाईक, भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर, मुरगावचे माजी नगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक मनीष आरोलकर, कृष्णा (दाजी) साळकर, समाजसेवक चंद्रकांत गावस, श्रीकांत धारगळकर, मुरगावच्या उपनगराध्यक्ष चित्रा गावस तसेच इतर अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्रींचे आशीर्वाद घेतले.
उद्या संध्याकाळी ५ वाजता प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीमहाराजांच्या पाद्यपूजेचा कार्यक्रम तसेच त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. इतर धार्मिक कार्यक्रमांबरोबर रविवार दि. १४ रोजी रात्री ९ वाजता "ओ बाय' हा कोकणी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
No comments:
Post a Comment