Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 9 December 2008

...तर निवासी डॉक्टरांचा कामावर बहिष्कार, अजूनही सहाव्या वेतन आयोगाची कार्यवाही नाही

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील निवासी डॉक्टरांना अजूनही सहावा वेतन आयोग लागू केला नसल्याने इस्पितळाच्या निवासी डॉक्टरांनी येत्या गुरुवारी म्हणजेच ११ डिसेंबर रोजी कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचे एक निवेदनही मुख्यमंत्री दिगंबर कामत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना देण्यात आले आहे. ही माहिती "गोमेकॉ' निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी दिली.
या अनुषंगाने येत्या बुधवारी दंडावर काळ्या फिती बांधून सायंकाळी ५ पर्यंत काम केले जाणार आहे. बुधवारी सरकारने सहावा वेतन लागू करण्याबाबत कोणतेही ठाम पाऊल उचलले गेले नाही तर गुरुवारी कामावर पूर्णपणे बहिष्कार टाकला जाणार असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.
देशभरातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन लागू झाला असताना गोमेकॉतील निवासी डॉक्टरांनाच त्यापासून वंचित ठेवण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. इस्पितळातील कनिष्ठ व वरिष्ठ डॉक्टरांना या आयोगानुसार वेतन दिले जाते. मग, केवळ निवासी डॉक्टरांनाच का वगळण्यात आले, असा प्रश्नही डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. गेल्या ऑक्टोबरपासून सहाव्या वेतनाचे नियम लागू करण्याच्या प्रयत्नात असून आरोग्यमंत्री राणे यांची भेट घेऊन चर्चाही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वित्त अतिरिक्त सचिव यांचीही भेट घेऊन चर्चा झाली आहे. मात्र अद्याप त्यावर ठोस कारवाई केली जात नाही, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
सहावा वेतन आयोग लागू झाल्याने इस्पितळातील झाडूवाले तसेच चालकांचेही वेतन निवासी डॉक्टरापेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे आरोग्य खात्यासमोर ठेवण्यात आलेल्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात. अन्यथा तोपर्यंत कामावर बहिष्कार टाकला जाणार असल्याचा इशारा या डॉक्टरांनी दिला आहे. सरकारला १० डिसेंबर रोजी सायंकाळी पाचपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

No comments: