Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 10 December 2008

मुंबई हल्ल्यातील संशयितांना भारताकडे सोपविणार नाही, पाकची पुन्हा अरेरावी

इस्लामाबाद, दि. ९ : पाकमधील ज्या अतिरेक्यांवर मुंबई हल्ला प्रकरणी संशय असेल त्यांच्यावर आमच्या कायद्याप्रमाणेच कारवाई होईल. ते दोषी असले तरी त्यांना भारताकडे सोपविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा हेका पाकने धरला आहे.
पाकचे विदेशमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी याबाबत म्हटले आहे की, आम्ही लष्कर-ए-तोयबा तसेच अन्य काही अतिरेकी संघटनांवर कारवाई सुरू केली आहे. पण, ती कारवाई संशयितांना अन्य देशांकडे सोपविण्यासाठी नाही. आम्ही आमच्या परीने दहशतवादविषयक गुन्ह्यांचे तपासकार्य करीत आहोत. त्याचा एक भाग म्हणून तोयबावरील कारवाई सुरू आहे. यातील काही लोक मुंबई हल्ल्यातील संशयित असले तरी त्यांना भारताकडे सोपविण्याचा आमचा विचार नाही.
आज ईदची प्रार्थना झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कुरेेशी म्हणाले की, मुंबई हल्लाप्रकरणी भारताने सुरू केलेल्या तपास कार्यात पूर्ण सहकार्य करण्याची प्रतिबद्धता आम्ही यापूर्वीच व्यक्त केली आहे. पण, या तपासात आमच्या हाती कोणी पाकिस्तानी गुन्हेगार लागला तर त्याच्यावर आमच्या देशातील न्यायालयातच कारवाई होईल. याविषयी भारताला जर आमच्या भूमिकेविषयी काही संभ्रम असेल तर आम्ही आमची बाजू मांडण्यासाठी भारतात जाऊन स्पष्टीकरण देऊ, असेही ते म्हणाले.
कालच पाकिस्तानी मंत्रिमंडळाने एका बैठकीत, मुंबई हल्ला प्रकरणातील संशयित पाकमध्ये आढळल्यास आपल्याच कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर कुरेशी यांनी हे वक्तव्य दिले.
------------------------------------------------------
मसूद अजहर नजरकैदेत, भारताच्या मागणीकडे पाकचे साफ दुर्लक्ष
इस्लामाबाद, दि. ९ : भारताला हवा असणारा जैश ए मोहम्मदचा कुख्यात अतिरेकी मसूद अजहर याला पाकी प्रशासनाने अटक करून त्याच्या घरीच नजरकैदेत ठेवले असल्याची माहिती मिळाली असून त्याला भारताच्या स्वाधीन करण्याच्या मागणीकडे पाकने साफ दुर्लक्ष केले आहे.
१९९९ मध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरणी भारताने अपहृत प्रवाशांच्या बदल्यात सोडलेल्या अतिरेक्यांमध्ये मसूद अजहरचाही समावेश होता. मुंबई हल्ल्यानंतर भारताने पाककडे ज्या २० अतिरेक्यांची यादी सोपविली होती त्यात मसूद अजहरचेही नाव होते. आता पाकने अमेरिका आणि भारताला दिलेल्या आश्वासनानुसार काही अतिरेकी संघटनांवर कारवाई सुरू केली आहे. त्यात त्यांनी मसूद अजहरवरही लगाम कसला आहे.
मसूद अजहरला बहवालपूर येथील मॉडेल टाऊन परिसरातील त्याच्या बहुमजली निवासस्थानी नजरकैदेत ठेवले असल्याचे वृत्त आहे. पाकी प्रशासनाने याबाबत माहिती देताना सांगितले की, भारताने मागणी केलेल्या अतिरेक्यांच्या यादीत मसूदचा समावेश असल्याने त्याच्या हालचालींवर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. याचाच एक भाग म्हणून त्याला नजरकैदेत ठेवले गेले आहे.
पाकी लष्कराने यापूर्वीच केलेल्या कारवाईत तोयबाचा कमांडर लाखवी याला अटक झाली आहे. मुंबई हल्ल्यामागे त्याचा हात असल्याचे बोलले जात आहे. पण, पाकने लाखवीसह मसूद अजहर, दाऊद आणि टायगर मेमन यांना भारताकडे सोपविण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

No comments: