नवी दिल्ली, दि. ८ : पाज राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील सत्ता कायम राखण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले असून, राजस्थानातील सत्ता भाजपला वाचवता आली नाही. दिल्लीत बहुमत मिळेल ही भाजपची आशाही धुळीस मिळाली आहे. राजस्थान आणि मिझोराम या दोन राज्यांत कॉंग्रेसचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राजस्थानात भाजपला यशस्वी शह देऊन कॉंग्रेसने बहुमताजवळचा आकडा गाठला आहे. मिझोराममध्ये कॉंग्रेसने मिझो नॅशनल फ्रंटकडून सत्ता हिरावून घेतली आहे; तर दिल्लीत मुख्यमंत्री शीला देशमुख यांनी हॅट्ट्रिक साधली आहे.
दिल्ली आणि राजस्थान या दोन्ही विधानसभांत भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागले असले तरी, विजयकुमार मल्होत्रा आणि वसुंधराराजे हे भाजपने आधीच घोषित केलेले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशात मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असलेले शिवराजसिंग चौहान, छत्तीसगडमध्ये डॉ. रमणसिंग हेही आपापल्या मतदारसंघांमध्ये विजयी झाले आहेत. ज्या राजस्थानात भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे, तिथे वसुंधराराजे यांनी आपल्या झालरापाटन मतदारसंघात ३२ हजार एवढ्या प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळविला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून मुख्यमंत्री शीला दीक्षित विजयी झाल्या आहेत.
मध्यप्रदेशात २३० पैकी भाजपाला १४२ जागा मिळाल्या असून, कॉंग्रेसला ७० जागा मिळाल्या आहेत. मायावतींच्या बहुजन समाज पार्टीला ७ जागा मिळाल्या आहेत, तर ११ जागी अपक्ष व इतर विजयी झाले आहेत. राजस्थानात २०० पैकी कॉंग्रेसला ९८, भाजपला ७६, बसपला ७ आणि अपक्ष व इतरांना १९ जागा मिळाल्या आहेत. छत्तीसगडच्या ९० पैकी भाजपाला ५०, कॉंग्रेसला ३८, बसपाला २ जागा मिळाल्या आहेत. तर दिल्लीच्या ६९ जागांपैकी कॉंग्रेसने ४२ जागा मिळविल्या असून, भाजपला २३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. बसपला २ आणि इतरांना २ जागा मिळाल्या आहेत. त्याचप्रमाणे मिझोराममध्ये ४० पैकी कॉंग्रेसला ३१ जागा मिळाल्या असून, मिझो नॅशनल फ्रंटला ४ आणि युडीएला ४ जागा मिळाल्या आहेत.
राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षा सुमित्रा सिंग या मंडवा मतदारसंघातून आणि छत्तीसगड विधानसभेचे अध्यक्ष प्रेमप्रकाश पांडे हे भिलाई मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्याचप्रमाणे छत्तीसगड विधानसभेतील विरोधी पक्षनेते महेंद्र कर्मा हे दंतेवाडा मतदारसंघातून पराभूत झाले असून, राजस्थान प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी हे नाथद्वारा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.
त्याचप्रमाणे राजस्थानात ज्या दोन नेत्यांमुळे भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागल्याचे सांगितले जात आहे, ते महाराजा विश्वेंद्रसिंग हे डीग-कुम्हेर मतदारसंघातून आणि मीणा समाजाचे नेते डॉ. किरोडीलाल मीणा हे सवाई माधोपूर मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. हे दोन्ही नेते स्वत: पराभूत झाले असले तरी, किमान १५ ते २० मतदारसंघांमध्ये त्यांच्या समर्थकांनी भाजपला नुकसान पोहोचविल्याचे सांगितले जात आहे.
मध्यप्रदेशात भारतीय जनशक्ती पार्टीच्या नेत्या उमा भारती यांनाही टिकमगड मतदारसंघात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. उमा भारतींचा पक्ष भाजपाच्या सत्तेच्या मार्गात अडथळे आणेल असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र उमा भारतीच पराभूत झाल्या आणि त्यांच्या पक्षाचा प्रभावही दिसून आलेला नाही. मतदारांनी त्यांना नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसचे दिग्गज अजित जोगी, त्यांच्या पत्नी रेणू जोगी, राजस्थानात कॉंग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य दावेदार अशोक गहलोत हेही त्यांच्या सरदारपुरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. भाजपा महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा किरण माहेश्वरी ह्या राजस्थानच्या राजसमंद मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment