पाकध्ये सुरक्षा यंत्रणाच्या कारवाईला जोरदार वेग
बॅंक खाती सील
संपत्ती गोठवली
कार्यालयांना टाळे
इस्लामाबाद, दि. १२ - लष्कर-ए-तोयबाची आघाडीची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमात-उद्-दावा या दहशतवादी संघटनेविरुध्दची कारवाई पाकिस्तान सरकारने जारी ठेवलेली असून पाकिस्तानी सुरक्षा दलांनी या संघटनेची देशातील अनेक कार्यालये आज सील केली तर या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांना आपल्या ताब्यात घेतले आहे.
जमात-उद्-दावा या संघटनेलाही अतिरेकी घोषित करण्यात येऊन तिच्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी युनोच्या सुरक्षा परिषदेने काल केल्यानंतर पाकिस्तानने कालपासून या संघटनेच्या विरोधात कारवाईला प्रारंभ केलेेेला आहे. हफिज मोहम्मद सईदला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे तर जमात-उद्-दावाच्या देशातील इतर कार्यालयांना सील ठोकण्याचे काम आज सुरू केले. या संघटनेवर नुसती बंदीच घालण्यात येऊ नये तर लष्कर-ए-तोयबाचे तसेच जमात-उद्-दावाचे नेत्यांना अटक करण्यात यावी त्यांची व त्यांच्या संघटनेची संपत्ती गोठविण्यात यावी, त्यांच्या प्रवासांवर निर्बंध लादण्यात यावेत, अशा मागण्या सुरक्षा परिषदेने कालच केलेल्या आहेत, हे येथे उल्लेखनीय.
काल गृहमंत्री तसेच परराष्ट्र मंत्र्यांबरोबर अनेक बैठकांमध्ये विचारविनिमय केल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी लष्कर-ए-तोयबा व जमात-उद्-दावाविरुध्द कारवाई करण्याचा निर्णय घेतला असे देशांतर्गत मंत्रालयाचे प्रमुख रेहमान मलिक यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. एपीपी या सरकारी वृत्तसंस्थेला माहिती देताना विशेष पोलिस अधीक्षक चौधरी शफिक अहमद यांनी सांगितले की, जमातचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईदला लाहोर शहरातील जोहार टाऊन या भागातील ब्लॉक ११६-ई या घरात तीन महिन्यांसाठी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. काल रात्रीपासून त्यांच्या या घराभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे अहमद यांनी पुढे सांगितले. जमात-उद्-दावाच्या अनेक कार्यकर्त्यांना पंजाब प्रांतात ताब्यात घेण्यात आले आहे.
युनोच्या सुरक्षा परिषदेने अतिरेकी म्हणून घोषित केलेल्या जमात-उद्-दावा व लष्कर-ए-तोयबाच्या नेत्यांची बॅंक खाती तसेच संपत्ती गोठविण्याचे आदेश स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तानने कालच देशातील सर्व बॅँकांना दिलेले आहेत. हाफिज मोहम्मद सईदशिवाय जमातच्या सात इतर नेत्यांनाही त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आलेलेेे आहे. जमातचे लाहोर शहरातील चौधरी चौकातील जमात-उल्-कादिसा हे कार्यालयही कालच ताब्यात घेेऊन सील करण्यात आलेले आहे. याशिवाय सियालकोटमधील पाच कार्यालयांसह पंजाब प्रांतातील जमातची अनेक कार्यालये पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
Saturday, 13 December 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment