पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): गोव्यात पर्यटन व्हिसावर वास्तव्य करणाऱ्या "येमेनी' (येमेन हा आफ्रिकेतील एक देश आहे) विद्यार्थ्यांची दोनापावला येथील समुद्र किनाऱ्यावर आज पहाटे झालेल्या संशयास्पद बैठकीच्या वृत्ताने पोलिस खात्याची झोपच उडाली आहे. सुमारे ५० ते ६० "येमेनी' विद्यार्थी तेथे उपस्थित होते, अशी माहिती खास सूत्राने "गोवादूत'ला दिली. या विद्यार्थ्यांना एका मौलवीकडून काहीतरी संदेशही देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, उद्या ९ रोजी "ईद' उत्सव असल्याने त्या अनुषंगाने बैठक घेतली असण्याची शक्यता असली तरी ती अशा ठिकाणी घेण्याचे नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. या वृत्ताबाबत गोवा पोलिस खात्याच्या गुप्तचर विभागाला कोणताही सुगावा लागला नसल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.
गोव्यात सध्या आफ्रिका व अरब राष्ट्रातील अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने ते राहात असल्याचे सरकारी पाहणीत आढळले आहे.यापूर्वी पणजीतील एका इंग्रजी भाषा शिकवणाऱ्या संस्थेची चौकशी केली असता तेथे अनेक येमेनी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे दिसून आले होते. यापैकी अनेक विद्यार्थी वर्गात अनियमित असल्याचेही आढळले होते.या विद्यार्थ्यांची कसून चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्य सचिव जे. पी. सिंग यांनी सांगितले होते. दरम्यान,हे विद्यार्थी इंग्रजी शिकण्यासाठी गोव्यात येतात खरे; परंतु ते वर्गात गैरहजर राहून नेमके काय करतात,याचा तपास गुप्तचर विभागाकडून सुरू आहे.
नाताळ नववर्षाला सतर्कतेचे आदेश
दरम्यान, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात देशीविदेशी पर्यटकांची झुंबड उडते. त्याच काळात येथे घातपात घडवून आणण्याची योजना दहशतवादी संघटनांनी आखल्याचे स्पष्ट संकेत मुंबई पोलिस आणि केंद्रीय गुप्तचर संघटनेच्या सूत्रांनी दिले आहेत. मुंबई हल्ल्यात पकडण्यात आलेला दहशतवादी अझम अमीर कसब याने दिलेल्या जबानीत त्यांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्यावेळी अन्य ४९० दहशतवाद्यांनाही प्रशिक्षण देण्यात आल्याची खळबळजनक माहिती उघड केली आहे. केंद्रीय गुप्तचर संघटनेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मच्छिमाऱ्यांच्या वेशात व भूमिकेत सुमारे ५०० दहशतवादी भारतात घुसण्याची शक्यता आहे. गोव्याला सुमारे १०३ किलोमीटरचा समुद्रपट्टा लाभला असून त्याच्या सुरक्षेबाबत कायमस्वरूपी यंत्रणा नसल्याने गोव्याला सतर्कतेचे आदेशही देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्रातील पुणे व गोव्याला खास करून नाताळ व नव वर्षाच्या निमित्ताने सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानमधील या प्रशिक्षणार्थ्यांना "आयएसआय' व "लष्कर ए तोयबा' या संघटनेतर्फे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहितीही पोलिस चौकशीत उघड झाली आहे. पोहणे, मोठ्या बोटी हाताळणे, टेहळणी करणे, पाण्याखालून हल्ला करणे, तसेच धरण उडवणे आदींचे खास प्रशिक्षण घेतलेल्या या दहशतवाद्यांची नेमकी कोणत्या ठिकाणांवर वक्रदृष्टी आहे, हाच आता गुप्तचर यंत्रणांसाठी आव्हानाचा विषय बनला आहे. इंडोनेशियातील "बाली' बेटावर झालेल्या हल्ल्यासारखी व्यूहरचना आखण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. गोवा हे आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने व येथे विदेशी पर्यटकांची संख्या प्रचंड असल्याने गोवा गेल्या २००२ सालापासून दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे.
गोव्याचे भौगोलिक क्षेत्र कमी असल्याने तसेच येथे दहशतवादी हल्ला घडवून पळ काढणे कठीण असल्याने गोव्यात गर्दीच्या ठिकाणी किंवा पर्यटकांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी आत्मघातकी हल्ल्याचे प्रयोजन असल्याची माहिती यापूर्वी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून बाहेर आली आहे. सध्या विविध ठिकाणी संशयास्पद पर्यटकांना ताब्यात घेण्याचे सत्र पोलिसांनी सुरू केले आहे.पोलिसांनी आत्तापर्यंत संशयावरून १० पर्यटकांना ताब्यात घेतल्याची माहिती दक्षिण गोव्याचे उपअधीक्षक उमेश गावकर यांनी दिली आहे.
-----------------------------------------------------
गोव्याला "फियादीन'चा धोका
"अल- कायदा" व "लष्कर ए तोयबा" या दहशतवादी संघटनांकडून पाकिस्तान समर्थक कट्टर काश्मिरी इस्लामी युवकांचा अशा कारवायांसाठी वापर केला जात असल्याचेही पाहणीत आढळून आले आहे. या लोकांना "फियादीन' म्हणून ओळखले जाते. हे लोक आत्मघाती हल्ले घडवून आणतात. त्यांच्या मनात भारतद्वेषाचे गरळ ओतून त्यांना भारतात सोडले जाते. ते व्यापार किंवा इतर बारीकसारीक व्यवसायाच्या निमित्ताने येथे आसरा घेतात व सर्व स्थितीचा अभ्यास करून महत्त्वाच्या ठिकाणांस लक्ष्य बनवतात,असेही पाहणीत आढळले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment