Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 3 August 2008

पणजी पोलिसांचा गेस्ट हाऊसवर छापा

मुंबईच्या आठ तरुणींना अटक
पणजी, दि. 3 (प्रतिनिधी) - करंझाळे ताळगाव येथील मोंतेरो गेस्ट हाउसवर छापा घालून पणजी पोलिसांनी आज सायंकाळी संशयास्पद स्थितीत राहणाऱ्या आठ तरुणी व दोघा तरुणांना ताब्यात घेतले. एका निनावी फोनद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे हा छापा घालण्यात आला. ताब्यात घेतलेल्या सर्व तरुण मालाड मुंबई येथे राहणाऱ्या असून "आम्ही नृत्य करण्यासाठी गोव्यात आलो आहोत', असे त्यांनी प्राथमिक चौकशीत पोलिसांना सांगितले आहे.
पोलिसांनी फौजदारी गुन्हा 41 नुसार वैशाली चंदू लक्ष्मण माने, भारती सतीश पवार, सायरा अनिस अन्सारी, नीशा सोनार चंद्रसिंग, हर्षदा महादेव भंडारी, ज्युली थॉमस पिंटो, नीता कृष्णा रामाणी, रेश्मा अब्दुल अन्सारी तसेच नरेश स्वामी नाईक (बिठ्ठोण गोवा) या तरुणी व मुथ्थूराज गोविंद दियोगोल (बेळगाव) या दोघा तरुणांना अटक करण्यात आली आहे. सर्व तरुणी 19 ते 25 वयोगटातील आहेत.
प्राप्त माहितीनुसार आज दुपारी पणजी पोलिस स्थानकावर एका अज्ञात व्यक्तीने करंझाळे ताळगाव येथील मोंतेरो गेस्ट हाउसमधे काही तरुणी राहात असल्याची माहिती दिली. नंतर पणजी पोलिस निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त यांनी आपल्या पथकासह त्या लॉजवर छापा टाकला असता एका खोलीत आठ तरुणी असल्याचे त्यांना आढळले. यावेळी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, गोव्यात हॉटेलमधे नृत्य करण्यासाठी आलो असून या लॉजमधे आम्ही नृत्याची तालीम करीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र त्या खोलीत पोलिसांना नृत्याची तालीम करण्यासाठी लागणारे साहित्य टेपरेकॉर्डर, किंवा सीडी प्लेअर सापडला नाही. दोन दिवसांपूर्वीच त्यांना गोव्यात आणले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. मात्र त्यांना कोणी गोव्यात आणले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
छापा टाकला तेव्हा तेथे त्यांच्याबरोबर त्या लॉजमधे मुथ्थूराज दोयगोल व नरेश नाईक हे तरुण उपस्थित होते. त्यामुळे चौकशीसाठी त्यांनाही ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली.
या विषयाचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश पेडणेकर करीत आहे.

No comments: