Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 3 August 2008

"राजीव गांधींच्या हत्येचे प्रमुख सूत्रधार मोकळेच'

नवी दिल्ली, दि.3 - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येबद्ल मला खेद वाटतो, असे या हत्याकांडातील एक आरोपी नलिनी श्रीहरन हिने म्हटले आहे. तथापि, या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार अजूनही मोकळे आहेत, असा दावा तिने केला.
राजीव गांधी हे महान नेते होते. त्यांच्या निधनामुळे देशाची मोठी हानी झाली आहे, असे पाच सदस्यीय मानवी बॉम्ब पथकातील एकमेव उरलेल्या नलिनीने म्हटले आहे. त्यांच्या हत्येत सहभागी होणे ही माझी सर्वात मोठी चूक ठरली, असे ती म्हणाली.
या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधारांविषयी विचारण्यात आले असता, ""खऱ्या मारेकऱ्यांचा मृत्यू झाला असला तरी प्रमुख सूत्रधार अजूनही मोकळेच आहेत. नलिनीची ही मुलाखत तिचे वकील एलानगोव्हन यांनी पाठविली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने तिला प्रश्नावली पाठविली होती.
या आत्मघाती पथकातील सदस्य असलेल्या धानूने 21 मे 1991 रोजी श्रीपेरूम्बुदूर येथे एका जाहीर सभेत राजीव गांधी यांच्यावर हल्ला केला होता. यात राजीव गांधी आणि अन्य 15 जण जागीच ठार झाले होते. मानवी बॉम्ब बनलेल्या धानूचे यात असंख्य तुकडे झाले होते. लिट्टेच्याच छायाचित्रकाराने या हत्येचे छायाचित्र काढले होते. चौकशीकाळात ते तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागल्यानंतर नलिनीचाही या हत्याकांडात सहभाग असल्याचे सिद्ध झाले होते. राजीव हत्येच्या एक महिन्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने तिला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली होती. तथापि, कॉंगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मध्यस्थीनंतर तिची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तित करण्यात आली होती.
प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेली माझी भेट ऐतिहासिक अशीच होती, असे नलिनीने म्हटले आहे. तथापि, या भेटीमागील मूळ उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. या बैठकीपूर्वी प्रियंका आणि नलिनी दोघीही एकमेकांसाठी परक्याच होत्या. पण, या भेटीनंतर नलिनीला प्रियंकाविषयी प्रचंड आदर वाटू लागला.

No comments: