पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) : शिक्षण खात्यातर्फे सुमारे १०२ नव्या प्राथमिक शिक्षकांची नेमणूक करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली असतानाच या खात्याचा ताबा आता ताळगावचे आमदार बाबुश मोन्सेरात यांच्याकडे सोपवण्यात आल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे. या पदावर नेमणूक व्हावी यासाठी अनेकांनी विविध मंत्री तथा आमदारांकडे लावलेला "प्रसाद' बाबूश यांच्यासमोर कितपत तग धरतो ही नवी डोकेदुखी आता त्यांना सतावू लागली आहे.
दरम्यान, शिक्षण खात्याने सादर केलेल्या अधिकृत माहितीनुसार खात्याकडे सुमारे १२४ अतिरिक्त शिक्षकांची नोंदणी केलेली आहे. तथापि मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी खात्यात अतिरिक्त १०२ प्राथमिक शिक्षकांची भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पदांसाठी खात्याकडे सुमारे साडेतीनशे अर्ज सादर झाले असून या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. आता अंतिम यादी जाहीर होणार असल्याच्या मुहूर्तावरच या खात्याचा ताबा बाबूश यांच्याकडे देण्यात आल्याने अनेकांची "गणिते' बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक उमेदवारांनी सत्ताधारी पक्षाचे नेते तथा आमदार यांच्याकरवी या पदावर आपली निवड व्हावी याबाबत केलेली बोलणी फोल ठरण्याचीच जास्त शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षण खाते हे बाबूश यांना दिल्याची वार्ता पसरल्यानंतर काही उमेदवारांनी तातडीने बाबूश यांच्याकडे रीघ लावल्याचीही वार्ता आहे.
राज्यातील विविध भागांत अनेक सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्याने हा अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध रिक्त पदे ग्रामीण भागात असून तिथे हे शिक्षक जायला तयार नाहीत याचमुळे या नव्या शिक्षकांना त्याठिकाणी पाठवण्याची शक्कल लढवली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्याच्या परिस्थितीत विविध ९२० सरकारी प्राथमिक शाळेत सुमारे २ हजार शिक्षक विद्यादान करीत आहेत. सरकारी धोरणानुसार एका शाळेत जर १३ विद्यार्थी असतील व तिथे दोन शिक्षक असतील तर एक शिक्षक अतिरिक्त असल्याचे घोषित करण्यात येते. बहुतेक खेडेगावात सरकारी शाळेतील विद्यार्थिसंख्या कमी असल्याने हा अतिरिक्त शिक्षकांचा घोळ झाल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, सध्या खेडेगावातून शहरी भागात बदली करण्यासाठी विविध असे सुमारे १७० अर्ज खात्याकडे पडून आहेत.
Thursday, 7 August 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment