Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 5 August 2008

बाबूशचे मंत्रिपद निश्चित नार्वेकरांना राजीनामा देण्याची सूचना

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): आज दिवसभर झालेल्या अत्यंत वेगवान राजकीय घडामोडींन्वये ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिपदावर आरूढ करण्यासाठी वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांचा पत्ता काटण्यास कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी अखेर मान्यता दिली आहे. त्यामुळे उद्या (मंगळवारी) सकाळी बाबूश यांना मंत्रिपदाची शपथ देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून कालच दिल्लीला परतलेले केंद्रीय निरीक्षक बी. के.हरिप्रसाद हे बाबूश मोन्सेरात यांनी दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यामुळे आज तातडीने गोव्यात हजर झाले.संध्याकाळी त्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन यांच्यासह राज्यपाल एस.एस.सिद्धू यांची राजभवनवर भेट घेऊन विद्यमान परिस्थितीवर चर्चा केली.
बाबूश यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून कॉंग्रेस पक्षात सध्या तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. त्यांच्या समावेशास प्रदेश कॉंग्रेस समितीचा विरोध आहे. तथापि, सरकार वाचवण्यासाठी त्यांना मंत्रिपद देणे गरजेचे असल्याचे श्रेष्ठींनी या पदाधिकाऱ्यांना सुनावल्याची माहिती मिळाली आहे. नार्वेकरांवर क्रिकेट तिकीट घोटाळाप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्याचे निमित्त पुढे केले जात आहे. मात्र, बाबूश यांच्याही अनेक भानगडी असल्याचे अनेकांनी हरिप्रसाद यांच्या नजरेस आणून दिल्याचे कळते.
दरम्यान, कॉंग्रेस श्रेष्ठींकडून या निर्णयाला विलंब होत असल्याने बाबूश यांनी निर्वाणीचा इशारा दिल्याने स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेण्याचा शब्द देऊन दिल्लीला परतलेले पक्षाचे गोवा प्रभारी हरिप्रसाद तातडीने आज संध्याकाळीच गोव्यात परतले. नंतर त्यांनी लगेच कामत व सार्दिन यांच्याशी चर्चा केली व अखेर राज्यपाल सिद्धू यांच्याशीही विचारविनिमय करून बाबूश यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचा कार्यक्रम लवकरात लवकर उरकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली.
दरम्यान, नार्वेकरांना मंत्रिपदावरून काढणार असे वृत्त पसरल्याने त्यांच्या समर्थकांनी आज सकाळीच त्यांच्या म्हापसा येथील निवासस्थानी गर्दी केली होती. नार्वेकरांना वगळल्यास त्याचे गंभीर परिणाम कॉंग्रेसला भोगावे लागतील, असा इशारा त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला. जर बाबूशशिवाय सरकार चालू शकत नाही तर नार्वेकरांशिवाय ते कसे चालते, ते पाहून घेऊ अशी भाषाही त्यांचे कट्टर समर्थक करीत होते.
राणेंच्या प्रस्तावाचेही राजकारण
दरम्यान,या एकूण परिस्थितीत काही नेत्यांनी आपला खाजगी अजेंडाही राबवण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत. या एकूण परिस्थितीत काही नेते नार्वेकर यांच्या मदतीने सभापती प्रतापसिंग राणे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची माळ घालण्यास उत्सुक असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. बाबूश यांचा समावेश करून आपली खुर्ची वाचवू पाहणाऱ्या दिगंबर कामत यांनाच या खुर्चीवरून खाली खेचण्याचा कुटील डाव या गटाने मांडल्याचे वृत्त आहे. राणे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिल्यास विश्वजित राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारीही ठेवली आहे. त्यामुळे या जागी पांडुरंग मडकईकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पाळी मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. दरम्यान,या वृत्ताबाबत कुणीही खुलेपणाने बोलण्यास जरी तयार नसले तरी या एकूण राजकीय खेळीत बाबूशच्या प्रवेशाचा वचपा दिगंबर कामत यांच्यावर काढण्याची व्यूहरचना आखली जात असल्याचेही वृत्त राजकीय गोटात पसरले आहे.

No comments: