पणजी, दि.९ (प्रतिनिधी): अमरनाथ देवस्थान समितीला दिलेली जागा विघातक शक्तींच्या दबावाला बळी पडून परत घेण्याच्या जम्मू काश्मीर सरकारच्या कृतीचा निषेध करण्यासाठी व ही जागा परत ताब्यात देण्याच्या मागणीसाठी भाजपतर्फे देशपातळीवर जेलभरो आंदोलन छेडण्यात आले आहे. गोव्यात येत्या १३ रोजी सुमारे एक हजार भाजप कार्यकर्त्यांचा मोर्चानिशी राजभवनवर धडक मारणार असून याप्रकरणी राज्यपालांना निवेदन दिले जाईल,अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार श्रीपाद नाईक यांनी केली.
आज येथे भाजप मुख्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर व उपाध्यक्ष सुभाष साळकर उपस्थित होते.१३ रोजी दुपारी ३ वाजता हा मोर्चा दोनापावला येथील चौकावरून सुरू होईल. देशात प्रत्येक धर्माला समान हक्क असताना बहुसंख्य हिंदूंबाबत सरकार आकसाने का वागते,असा सवाल नाईक यांनी केला. देशविदेशातून लाखो भाविक अमरनाथ यात्रेला जातात. त्यांच्या सोयीसाठी तेथे कायमस्वरूपी जागा निश्चित करून यात्रेकरूंना आवश्यक सुविधा तयार करून देण्यासाठी ही जमीन देवस्थान समितीला देण्यात आली होती. मात्र काही विघातक शक्तींच्या हट्टापायी जम्मू-काश्मीर सरकारने ही जमीन परत बळकावल्याने हा हिंदूंचा अपमान असल्याचे नाईक म्हणाले.
एकीकडे हाज यात्रेकरूंना विदेशात जाण्यासाठी सरकारतर्फे सर्व सोयीसुविधा व आर्थिक साहाय्य देण्यात येते तर दुसरीकडे आपल्याच देशात हिंदूंना देवाचे दर्शन घेण्यासाठी सुविधा निर्माण करण्यास असा मज्जाव केला जातो हे कितपत योग्य आहे,असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
केंद्रातील कॉंग्रेस आघाडी सरकारने आपल्याच पक्षाच्या जम्मू-काश्मीर सरकारला त्वरित आदेश जारी करून ही जागा परत देवस्थान समितीला देण्याची मागणी भाजपने केली आहे. राज्यपालांना सादर करण्यात येणाऱ्या निवेदनात ही मागणी करण्यात आली असून त्यांनी ही मागणी राष्ट्रपती व पंतप्रधानांना कळवावी. विघातक घटकांना चिरडणे ही काळाची गरज आहे.भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
Saturday, 9 August 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment