पणजी, दि.९ (प्रतिनिधी): 'मुले म्हणजे देवाघरची फुले'. असह्य प्रसूती वेदना सहजपणे सहन करीत बाळाला जन्म देणारी माता व त्या वेदनांचे घाव कानावर झेलत दोघांच्याही सुखरूपतेची याचना देवाकडे करणारा पिता यांच्यासाठी आयुष्यातील हा अद्भुतक्षण. बाळाला जन्म दिल्यानंतर ते निरोगी असेल तर देवच पावला म्हणायचा. दुर्दैवाने काही पालकांच्या नशिबात हे सुख नसते. बाळ जन्मते; तथापि उपजतच त्यात काहीतरी दोष आढळतात. त्यामुळे पालकांना आणखी एका दिव्यातून पार व्हावे लागते. यावेळी डॉक्टर हाच त्यांच्यासाठी देव असतो. जन्मजात ह्रदयविकाराचा दोष आढळलेल्या अशा बाळांवर शस्त्रक्रिया करून त्यांना पुनर्जन्म देण्याची किमया बंगळूरस्थित "वॉखार्ट'इस्पितळाचे डॉ. एन. एस.देवानंद व डॉ. विवेक जावळी यांनी साधली आणि या पालकांच्या डोळ्यांतील "अश्रूंची जणू फुलेच"झाली!
"वॉखार्ट' इस्पितळाच्या बालरोगशास्त्र विभागाला आज (शनिवारी) एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पणजीत एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. कुलासो,डॉ. गावकर यांच्यासोबत बाल ह्रदयशस्त्रक्रियेत नैपुण्य सिद्ध केलेले डॉ.देवानंद उपस्थित होते. "वेळीच निदान व योग्य उपचार' हा कोणत्याही आरोग्य दोषांवरील मूलमंत्र आहे. डॉ.कुलासो यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या एका वर्षांत या इस्पितळात सुमारे ७० गोमंतकीय बालकांवर उपचार करण्यात आले. त्यात सुमारे ६० बालकांवर ह्रदयशस्त्रक्रीया व तर १० बालकांवर शस्त्रक्रियाविरहित यशस्वी उपचार करण्यात आले. देशात रोज सुमारे १ लाख ८० हजार मुले ही जन्मजात ह्रदयविकारग्रस्त असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. देशातील बहुतेक शल्यविशारद हे प्रौढांवरील शस्त्रक्रिया स्वीकारतात. अर्भकांच्या ह्रदयावर शस्त्रक्रिया करणे ही महाकठीण गोष्ट. त्यासाठी आत्मविश्वास,धैर्य व तेवढेच कौशल्य असावे लागते व ही किमया वॉखार्टचे डॉक्टर देवानंद यांनी साधल्याचे डॉ.कुलासो यांनी सांगितले.
डॉ. देवानंद यांनी सर्वांत लहान म्हणजे केवळ २४ तासांच्या बाळावर ह्रदयशस्त्रक्रिया केली आहे. २५ टक्के रुग्ण एक महिन्यापेक्षा कमी,९० टक्के एका वर्षापेक्षा कमी तर फक्त १० टक्के एक वर्षाहून जास्त वय असलेल्या मुलांवर तेथे उपचार करण्यात आले. डॉ.देवानंद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गोवा सरकारचे अभिनंदन केले. देशात फक्त गोवा सरकारने मेडिक्लेम योजना राबवून आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना मोठा आधार दिल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. या योजनेमुळेच आज बहुतेक अशा बाळांना नवजन्म मिळाल्याचे ते म्हणाले. गोव्यात जन्मजात बाळांवरील दोषांवर उपचार कोणत्याही पाश्चात्य राष्ट्रांत मिळणाऱ्या उपचारांच्या दर्जाचे असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात बालमृत्यूचे प्रमाण नक्कीच कमी असून अर्भकांना जीवदान मिळण्याची टक्केवारीही जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अर्भकांना उपजतच ह्रदयविकार आढळून येण्यामागची नेमकी कारणे अजून स्पष्ट झाली नसली तरी उशिरा लग्न व नातेसंबंधात झालेला विवाह या गोष्टी कारणीभूत ठरण्याची जास्त शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गोवा आरोग्य महाविद्यालयात उपचार होऊ न शकलेल्या रोगांवर वॉखार्ट इस्पितळात उपचार घेण्यास गोवा सरकारने अधिकृत मान्यता दिल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. याप्रसंगी शस्त्रक्रिया केलेली मुलेही त्यांच्या पालकांसोबत उपस्थित होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment