पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) : ऍड.दयानंद नार्वेकर यांच्या विरोधातील बनावट क्रिकेट तिकीट घोटाळा प्रकरणी मडगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आरोपपत्र निश्चित करण्यासंबंधीच्या आदेशाविरोधात नार्वेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर उद्या ८ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. आरोपपत्र दाखल केले या मुद्यावरून कॉंग्रेस श्रेष्ठींनी त्यांना मंत्रिपदावरून पायउतार होण्यास भाग पाडल्याने उद्या याबाबत उच्च न्यायालय काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विद्यमान विधानसभेतील जाणकार व अनुभवी राजकारणी अशी ओळख असलेल्या नार्वेकर यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडून त्यांच्या जागी ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांची वर्णी लावण्यात आली आहे. कॉंग्रेस श्रेष्ठींच्या या अजब निर्णयाबाबत सध्या कॉंग्रेस पक्षात नाराजी पसरली आहेच; परंतु दिगंबर कामत यांची हतबलताही चव्हाट्यावर आली आहे. ६ एप्रिल २००१ साली फातोर्डा येथे भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान एकदिवसीय सामन्यावेळी बनावट तिकीटे विकली गेल्याने प्रेक्षकांत प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता व अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात अनेकांना विनाकारण मार खावा लागला होता. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत तत्कालीन गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष दयानंद नार्वेकर व अन्य आठ जणांविरोधात विविध गुन्ह्याखाली तक्रार नोंद केली होती. याप्रकरणी मडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी गेल्या ४ एप्रिल रोजी दिलेल्या निकालात नार्वेकर व अन्य आठजणांविरोधात आरोपपत्र निश्चित करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला नार्वेकर व त्यांचे अन्य दोन सहकारी गोवा क्रिकेट संघटनेचे सचिव विनोद फडके व एकनाथ नाईक यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान,यापूर्वी नार्वेकर यांनी अन्य सहकाऱ्यांसह प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दिलेली आव्हान याचिका फेटाळण्यात आल्याने त्यांचा तो प्रयत्न फोल ठरला होता. उद्या उच्च न्यायालयात जर या आदेशाला स्थगिती मिळवण्यात यश मिळाल्यास ते पुन्हा मंत्रिपदावर दावा करणार आहेत व त्यामुळे कामत सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment