पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): ब्रिटिश युवती स्कार्लेट किलिंग हिची आई फियोनाविरुद्ध काल "उठ गोयकारा' संघटनेने बाल न्यायालयात केलेल्या तक्रारीची दाखल घेऊन आज बाल न्यायालयाने हणजूण पोलिस आणि सरकारी वकिलांनाही नोटीस बजावली आहे. याविषयाची पुढील सुनावणी ११ ऑगस्ट ०८ रोजी ठेवण्यात आली आहे.
फियोनाने आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला गोव्यात अज्ञात व्यक्तीच्या स्वाधीन करून गोव्यातील बालकायद्याचे उल्लंघन केल्याने तिच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्कार्लेटच्या मृत्यूला तिची आई फियोनाच जबाबदार असल्याचा दावा ऍड. आयरिश रॉड्रीगीस यांनी सादर केलेल्या तक्रारीत केला आहे. त्याचप्रमाणे फियोनाच्या गोव्यातील संशयास्पद वास्तव्याची चौकशी सीबीआयद्वारे करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यंदाच्या १८ फेब्रुवारी रोजी स्कार्लेटचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह हणजूण किनाऱ्यावर आढळला होता. त्यानंतर दोन दिवसांनी गोकर्ण येथे पर्यटनासाठी गेलेली फियोना गोव्यात दाखल झाल्यावर तिने स्कार्लेटचा खून झाल्याचा दावा करून पोलिसांवर व गृहमंत्र्यावर आरोप केले होते. सध्या या खून प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे.
Tuesday, 5 August 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment