मडगाव,दि. ४ (प्रतिनिधी) : मोक्याच्या जागी ठेवलेल्या दुचाक्या हेरून त्या पळवायच्या व भारी किंमतीच्या त्या गाड्या मोडीच्या भावाने भंगारअड्ड्यांना विकणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मडगाव पोलिसांनी अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
आग्नेल केवीन उर्फ अरविंदसिंग बेदी असे आरोपीचे नाव असून त्याने कोलमरड नावेली (कुडचडकर हॉस्पिटलसमोर) येथील भंगारअड्डयात विकलेल्या दोन दुचाक्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यातील एक बुलेट तर दुसरी बजाज कॅलिबर आहे.सदर दोन्ही दुचाक्या त्याने भंगारात विकल्याने या प्रकरणात भंगारअड्डयाचा मालकही सामील आहे की काय त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
या अड्डयावर काम करणारा अब्दुल्ल रझाक हा आग्नेलचा दोस्त होता व त्याच्या ओळखीनेच त्याने सदर दुचाक्या तेथे आणून विकल्या होत्या असे पोलिस तपासात आढळून आले आहे.पोलिसांनी सदर अब्दुल तसेच भंगारअड्ड्याचा मालक सैय्यद यांना पाचारण करून चैाकशी केली. आग्नेलचे ते साथीदार असावेत असा पोलिसांना संशय आहे.त्याने या पूर्वी अशा प्रकारे आणखी दुचाक्या आणून विकलेल्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे. या दुचाक्यांचे सुटे भाग काढलेले असून ते कुणाला विकले त्याची चौकशीही सुरू आहे. ते आणखी कुणाला विकले असतील तर हे रॅकेट मोठे असू शकते. शहराच्या विविध भागातून गेल्या जानेवारीपासून आजवर ३५ दुचाक्या चोरीस गेल्या असून आहेत. त्यातील काहींची नोंद चोरीऐवजी बेपत्ता वा हरवली अशी करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातून एखादी मोठी टोळी उघडकीस येते की काय याची चाचपणी पोलिसांकडून सुरू आहे.
Monday, 4 August 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment