Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 7 August 2008

मोन्सेरात यांना शिक्षणखाते : मुख्यमंत्र्यांच्या विनोदामुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) : शिक्षण खात्याचे जड झालेले ओझे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी नवनियुक्तमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या गळात घालून त्यातून स्वतःची सुटका करून घेतली खरी; परंतु मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे मात्र आज अनेकांना धक्काच बसला. शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे खाते असल्याने मुख्यमंत्री निदान या खात्याच्या बाबतीत तरी असा धक्कादायक निर्णय घेणार नाहीत असे वाटत असतानाच त्यांनी मोन्सेरात यांना हे खाते बहाल करून "शिक्षण खाते मोन्सेरात यांना मिळणार' या विनोदाचे वास्तवात रूपांतर केले. शिक्षण क्षेत्रातील अनेकांना या निर्णयामुळे हसावे की रडावे तेच कळेनासे झाले आहे.
या आधी दयानंद नार्वेकर या ज्येष्ठ मंत्र्याला वगळून मुख्यमंत्री कामत यांनी मोन्सेरात यांना मंत्रिमंडळात घेतले तेव्हा अनेकांनी विनोदाचा भाग म्हणून मोन्सेरात यांना शिक्षण खाते मिळणार असा विनोद केला होता. प्रत्यक्षातही मुख्यमंत्र्यांना हा विनोद गांभीर्याने घेत मोन्सेरात यांना चक्क राज्याचे शिक्षणमंत्री करून कल्पनेपेक्षाही भयंकर अशा अनुभवाचा साक्षात्कार घडवला अशा प्रतिक्रिया आज सायंकाळी ऐकायला मिळाल्या. गोव्याचे शिक्षणक्षेत्र सध्या अनेक कारणांनी वादाचे केंद्र बनले आहे. पुस्तकांचा घोळ, बदल्यांचा घोळ, "एनसीईआरटी'चा घोळ, सर्वशिक्षा अभियानाचा घोळ, शालांत मंडळाचा घोळ, प्राथमिक शिक्षक भरती अशा अनेक घोळांत अशरक्षः रुतलेले हे खाते बाहेर काढण्याचे दूरच, किंबहुना तेअधिक खोलात रुतावे अशी भक्कम तरतूद मुख्यमंत्र्यांनी आजच्या खाते वाटपाद्वारे केली आहे.मोन्सेरात मंत्रिपद हाताळू शकत नाहीत असे नाही; परंतु त्यासाठी कोणती जबाबदारी कोण पेलू शकेल याचे किमान तारतम्य मुख्यमंत्र्यांनी ठेवायला हवे होते. मोन्सेरात यांनी नार्वेकरांकडे असलेली कायदा आणि माहिती तंत्रज्ञान ही खाती घेण्यास नकार दिल्याने त्यांच्या गळ्यात शिक्षणासारखे महत्त्वाचे खाते बांधायचे म्हणजे कामत यांना सध्या झाले तरी काय, असे म्हणण्याची पाळी सध्या अनेकांवर आली आहे. सुदैवाने बाबुश यांनी वित्त खाते मागितलेले नाही, अन्यथा सध्याच्या राजकीय दबावाच्या स्थितीत मुख्यमंत्र्यांनी तेसुध्दा त्यांना देऊन टाकले असते असेही काहींनी बोलून दाखवले.
दरम्यान नार्वेकरांकडे असलेले वित्त खाते म्हणजे मुख्यमंत्र्यासाठीच मोठी डोकेदुखी झाली होती व येनकेन प्रकारेण हे खाते स्वतःकडे ठेवण्यासाठी त्यांनी बाबूश यांचा वापर करून नार्वेकरांचा काटा काढला अशी चर्चा आता खुद्द कॉंग्रेसमध्येच सुरू झाली आहे. बाबूश यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे आणि पूर्वी सरकारविरोधी झालेल्या पहिल्या बंडाच्या वेळी तसे ठरले होते असे मुख्यमंत्र्यांनी किंवा अन्य कोणी कितीही सांगितले असले तरी, खुद्द सुदिन ढवळीकरांसारख्यांनी तसे काहीच घडले नव्हते असे स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ नार्वेकरांनी वित्त खात्याचा गाडा मार्गी लावण्यासाठी काही खात्यांचे "स्क्रू टाइट' केल्याने त्याचा चांगलाच फटका मुख्यमंत्र्यांसारख्यांनाही बसल्यामुळे एखादे भक्कम कारण पुढे करून नार्वेकरांचा काटा काढण्याचे राजकारण शिजले असल्याची सर्रास चर्चा सध्या राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे. दरम्यान,शिक्षण खात्याबरोबर तांत्रिक शिक्षण व पुरातत्त्व व पुराभिलेख खातेही मोन्सेरात यांना देण्यात आल्याची अधिसूचना आज जारी करण्यात आली.

No comments: