पणजी, दि. 8 (प्रतिनिधी) - गोव्यात जमीन विक्री व्यवहारांबाबत घटनात्मक प्रतिबंध घालण्यासाठी विशेष दर्जाची मागणी करणारा ठराव येत्या विधानसभा अधिवेशनात मांडला जाईल,अशी घोषणा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली.
गोव्यासारख्या लहान प्रदेशात प्रचंड जमिनी विकल्या गेल्या तर भविष्यात येथे बिकट स्थिती निर्माण होण्याचा धोका पर्रीकर यांनी व्यक्त केला. गोव्याच्या एकूण 3702 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात एकूण 800 चौरस किलोमीटर भूभाग आहे. त्यातील सुमारे 450 चौरस किलोमीटर जागा वापरात आणली गेल्याने उर्वरित भागावर अतिक्रमण होऊ लागले तर भविष्यात गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असल्याचे पर्रीकर म्हणाले. ईशान्येकडील राज्यांत ज्याप्रमाणे भूविक्रीवर निर्बंध आहेत तसेच ते गोव्यातही घालण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.घटनेच्या 371 कलमाच्या आधारे याबाबतचा विशेष दर्जा गोव्याला मिळवून देण्याबाबत विधानसभेत एकमुखी ठराव घेण्यात यावा आणि या ठरावास सर्व आमदारांनी पाठिंबा द्यावा,असे आवाहन पर्रीकर यांनी केले.
गोव्यात स्थलांतरीतांचे मोठे लोंढे येत असल्याने येथील पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. राज्यात झोपडपट्ट्या वाढत आहेत. पाणी व वीजटंचाई लोकांना भेडसावत असल्याने गावागावांत असंतोष पसरत आहे. अतिक्रमणे वाढत असून त्याबाबत त्वरित उपाययोजना केली नाही तर स्थिती आटोक्यात येणे कठीण आहे. गोवा हे लहान राज्य असल्याने आर्थिक सवलतींच्या बाबतीतही या राज्याला विशेष दर्जा मिळावा.तसा ठराव संमत करून तो केंद्राला पाठवण्यात यावा,असे पर्रीकर म्हणाले.
जाहिरात धोरणाव्दारे अनैतिकतेला राजमान्यता
सरकारने अलीकडेच जाहिरात धोरणाचा जाहीर केलेला मसुदा वृत्तपत्रांच्या नैतिकतेला काळिमा फासणाराच ठरणार असल्याचा धोका दामोदर नाईक यांनी व्यक्त केला. धोरणाच्या पाचव्या परिशिष्टाप्रमाणे बातमीसारख्या जाहिरातींना मान्यता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एखादी सरकारी जाहिरात बातमीच्या स्वरूपात प्रसिद्ध करणे कितपत योग्य आहे, असे विचारून हा वृत्तपत्रांच्या नैतिकतेलाच तडा असल्याचे दामोदर नाईक म्हणाले. अशा गोष्टींना राजमान्यता देणे म्हणजे वृत्तपत्रांच्या विश्वासार्हतेवरच घाला असल्याची टीका त्यांनी केली. वृत्तपत्रांच्या खपानुसार जाहिरात देण्याचे निश्चित करताना ठरवलेले निकषही लहान तथा प्रादेशिक वृत्तपत्रांसाठी धोकादायक असल्याचे मत दामोदर नाईक यांनी व्यक्त केले.
Friday, 8 August 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment