Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 7 August 2008

नार्वेकरांना वगळल्याने कॉंग्रेसमध्ये तीव्र असंतोष राजकीय स्थिती चिघळण्याची शक्यता

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): राज्यात नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडीत ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांची मंत्रिपदी वर्णी लावण्यासाठी ऍड. दयानंद नार्वेकरांना वगळण्याचा निर्णय मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांना रूचलेला नाहीच; किंबहुना प्रदेश कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना आणि पक्ष कार्यकर्त्यांनाही तो आवडलेला नसल्याचे सद्यस्थितीवरून स्पष्ट झाले आहे. मंत्रिमंडळातील एक गट त्यामुळे चांगलाच अस्वस्थ बनला असून या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत राज्यात पुन्हा राजकीय भुकंपाची होऊ शकतो. नार्वेकरांना वगळण्याचा निर्णय कामत सरकारवरच बूमरॅंग होण्याची दाट शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे.
नार्वेकर यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडून मोन्सेरात यांची वर्णी लावल्याने आज राज्यभरातून विविध प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. सुदैवानेच मुख्यमंत्रिपद मिळालेल्या दिगंबर कामत यांच्याकडून आपली खुर्ची वाचवण्यासाठी जी धडपड व राजकीय सट्टेबाजी सुरू आहे ती कॉंग्रेसच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याचे उघड मतप्रदर्शन खुद्द कॉंग्रेस कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. सरकारात सध्या केवळ सासष्टी तालुक्याची लॉबी झाल्याने या राजकारणाला वेगळेच वळण मिळाले आहे असून यासंदर्भात काही नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नार्वेकरांवर क्रिकेट तिकीट घोटाळाप्रकरणी निश्चित झालेल्या आरोपपत्राविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असल्याने त्याचा निर्णय होण्याआधीच मुख्यमंत्र्यांनीच मात्र नार्वेकरांविरोधात निर्णय देऊन आपला राजकीय कार्यभाग साधल्याचे आज काहींनी बोलून दाखवले. एका विशिष्ट लॉबीच्या दबावाखाली बहुजन समाजाच्या नेत्यांना पक्षात संपवण्याचे कारस्थान राबवले जात असल्याचा सर्रास आरोपही पक्षात होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आज दिवसभर वातावरण तणावपूर्ण होते.
नार्वेकरांची जय्यत तयारी
दरम्यान, आमदार नार्वेकर यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी व प्रसंगी राजकीय डावपेचांना सडेतोड उत्तर देण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी काळात त्याचे परिणाम दिसतील असे नार्वेकरांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. सध्या त्यांनी घिसाईघाईने पावले उचलून वातावरण न बिघडवण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केल्याचे समजते. मंत्रिपद काढून घेण्यासंदर्भात त्यांनी अद्याप प्रसारमाध्यमांकडेही आपली भूमिका व्यक्त केली नसली तरी जय्यत तयारीनीशी ते पुन्हा राजकीय रणांगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे संकेत त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाले आहेत. तिकीट घोटाळ्याचे राजकारण करून मंत्रिपद हिसकावून घेतले खरे परंतु या बदल्यात बाबूश यांना हे पद देण्यात आल्याने आता बाबूश यांच्या भानगडींची गाथाच तयार करून ती श्रेष्ठींना पाठवण्याची तयारीही नार्वेकरांनी केल्याचे समजते. येत्या दोन दिवसात गोष्टी स्पष्ट होतील असेही या सूत्रांकडून सांगण्यात आले.
एक हात मिळाला...
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी वित्त व गृह खाते नार्वेकर व रवी नाईक यांच्याकडे दिल्याने त्यांना "शोले' चित्रपटातील "ठाकूर'ची उपमा बाबूश यांनी दिली होती. आता नार्वेकरांकडील वित्त खाते मुख्यमंत्र्यांकडे चालून आले आहे व लवकरच रवी नाईक यांच्याकडील गृह खातेही त्यांना मिळवून देण्याचा कट आघाडीतील एका गटाकडून आखला जात असल्याची माहिती मिळाली आहे. ठाकूरचा एक हात परत मिळाला व दुसरा हातही परत मिळवण्याचा चंग या उपद्रवी गटाने बांधल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात चवीने सुरू आहे

No comments: