साखळी व पाळी, दि. ४ (प्रतिनिधी): पाळी मतदारसंघाचे लाडके आमदार व धडाडीचे तरूण नेतृत्व प्रा. गुरुदास गावस आज काळाच्या पडद्याआड गेले. गेले बरेच दिवस मुंबई येथील बिचकॅन्डी इस्पितळामध्ये ते मृत्यूशी झुंज देत होते, पण आज दि. ४ जून रोजी दुपारी २.३० वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. गरीब व दीनदुबळ्या समाजाविषयी तळमळ असलेले, शिक्षण, क्रीडा, संगीत क्षेत्रांची जाण असलेले एक उमलते नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. सरकारने गावस यांच्या निधनाबद्दल तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
उद्या दि. ५ जून रोजी सकाळी मुंबईहून विमानाने त्यांचा मृतदेह आणण्यात येणार असून तो त्यांच्या नावेली येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.दुपारी ३.३० वाजता त्यांच्या बंगल्यासमोरील विविधा हायर सेकंडरीच्या बाजूला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
अशी घडली त्यांची कारकिर्द
६ ऑक्टोबर १९६६ रोजी नावेली गांवी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण नावेली गावात झाले व पाचवीनंतर साखळीच्या प्रोग्रेस हायस्कूलमध्ये ते दहावीपर्यंत शिकले पुढे साखळी येथील गव्हर्मेंट हायर सेकंडरी स्कूलमध्ये बारावी करून साखळीच्या कॉलेजमध्ये एम.कॉम. केले.
पुढील शिक्षण बी.एड.पर्यंत झाले. उच्च शिक्षित म्हणून ते अल्पावधीत नावारूपास आले. शिक्षणाव्यतिरिक्त शालेय पातळीवर त्यांनी क्रीडा संस्था स्थापन केल्या. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील युवकांना घेऊन त्यांनी क्रिकेट क्लब स्थापन केले. ते स्वतः चांगले क्रिकेट खेळाडू होते. गावातील मुलांची शिक्षणासाठी होणारी हेळसांड बघून, या युवकांसाठी काही तरी केले पाहिजे या भावनेने त्यावेळचे पाळीचे आमदार व शिक्षण मंत्री विनयकुमार उसगावकर यांच्यामार्फत त्यांनी अकरा व बारावीच्या वर्गांना परवानगी घेऊन विविधा उच्च माध्यमिक विद्यालय सुरू केले व त्यानंतर कला, विज्ञान व वाणिज्य शाखांमधून अभ्यासक्रम सुरू केला. शिक्षणातील क्रांती वाखाणण्याजोगी होती. म्हणून त्यांनी स्वतःचे विविधा विद्या प्रतिष्ठान ही वास्तू उभारून शिक्षणाची नवी द्वारे खुली केली.
आज लोक त्यांच्याकडे आदराने पाहात होते. दोन वर्षे ते सरकारी खात्यात होते, पण त्यांच्यातील नेतृत्वगुण त्यांना स्वस्थ बसू देईनात. एक धडाडीचे तरूण म्हणून आपल्या गावात ते नावारूपाला आले. कुठेही अन्याय घडला तर गुरूदास कायम पुढे असायचे. त्यांच्या या समाजकारणाने त्यांना राजकारणाची ओढ लावली. नोकरी सोडून त्यांनी राजकारणात झोकून दिले. त्यांनी सहकार क्षेत्रातील अनुभवावरून विविधा क्रेडीट सोसायटीची स्थापना केली. आज त्याच्या गोवाभर आठ ते दहा शाखा आहेत. त्यानंतर प्राथमिक विद्यालय, केजी , नर्सिंग स्कूल अशा अनेक संस्था स्थापन केल्या. राजकारणात त्यांनी दोन वेळा कॉंग्रेस तिकिटावर उभे राहून निवडून येण्याचे प्रयत्न केले मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत बाराशे मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. त्यांच्या या यशात त्यांना आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे ते सांगत असत. सध्या ते गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष होते. सहा महिन्यांपूर्वी छातीत दुखत असल्याने त्यांच्यावर मुंबईत उपचार करण्यात आले होते. अलीकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना छातीत दुखू लागल्यावर त्यांना परत यावे लागले. गेले आठदहा दिवस ते मुंबई येथील ब्रीच कॅन्डी इस्पितळात उपचार घेत होते. अखेर मृत्यूशी झुंज देतानाचा त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी आश्विनी, पुत्र ओंकार, आई पार्वती, वडील प्रभाकर, चार भाऊ, भावजया, पुतण्या असा परिवार आहे.
युवा व धडाडीचा आमदार गमावलाः मुख्यमंत्री
पाळी मतदारसंघ हा राज्यातील एक आदर्श मतदारसंघ बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या प्रा.गांवस यांच्या निधनामुळे येथील जनतेने एक प्रामाणिक व सचोटीचा प्रतिनिधी गमावल्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. त्यांची पोकळी न भरून येणारी आहे. गोवा हस्तकला विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यांनी राज्यातील हस्तकारागिरांसाठी विविध योजना राबवण्यासाठी पुढाकार घेतल्याचा खास उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
प्रामाणिक कार्यकर्ता हरवलाः सार्दिन
एक सामान्य, प्रामाणिक, सच्चा व खास करून तळागाळापर्यंत पक्षासाठी झटणारा कार्यकर्ता हरवल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन यांनी म्हटले आहे. एका सामान्य कार्यकर्त्यांपासून उत्तर गोवा जिल्हा अध्यक्षपदापर्यंतचा प्रा.गांवस यांचा प्रवास हीच त्यांच्या निष्ठावंत कार्याची पावती होती,असे उद्गार सार्दिन यांनी काढले.
स्वाभिमानी कॉंग्रेस नेताः खासदार शांताराम नाईक
उत्तर गोव्यात कॉंग्रेस पक्षाची घसरण सुरू असताना आपल्या कार्याव्दारे पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेहमीच उत्तेजन व ऊर्जा देण्याचे काम केलेले प्रा.गांवस हे स्वाभिमानी व धाडसी नेते होते,असे उद्गार राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी काढले आहेत. पाळी मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी लोकांनी त्यांना विधानसभेत पाठवले व प्रत्यक्षात त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली असतानाच त्यांचे निधन होणे ही या मतदारसंघाची मोठी हानी झाल्याचे श्री. नाईक म्हणाले.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ऍड.खलप
सामाजिक, शैक्षणिक, सहकार, सांस्कृतिक व राजकारण अशा विविध क्षेत्रांत आपला वेगळा ठसा निर्माण केलेले प्रा.गांवस हे खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते,असा संदेश माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड.रमाकांत खलप यांनी दिला आहे. म्हापसा अर्बन बॅंकेचे संचालक म्हणून प्रा.गांवस यांची निवड झाली होती. या कारकिर्दीत बॅंकेच्या प्रगतीत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिल्याचेही या बॅंकेचे अध्यक्ष या नात्याने ऍड.खलप म्हणाले. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कदापि भरून येणारी नाही, असेही ऍड.खलप म्हणाले.
प्रदेश कॉंग्रेसची तातडीची बैठक
गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीची तातडीची बैठक उद्या ५ रोजी सकाळी १०.३० वाजता कॉंग्रेस भवनमध्ये होणार आहे. पाळीचे आमदार प्रा.गुरूदास गांवस यांच्या अकाली निधनाबद्दल या बैठकीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याने समितीच्या सर्व सदस्यांनी उपस्थीत राहावे असे आवाहन प्रदेश सरचिटणीस डॉ.उल्हास परब यांनी केले आहे.
Wednesday, 4 June 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment