Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 6 June 2008

महागाई कमी करा किंवा सत्ता सोडा भाजपाचा आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली, दि. ६ : महागाई कमी करण्यास पूर्णपणे अपयशी ठरलेले केंद्रातील कॉंगे्रसप्रणित संपुआ सरकार विशेषत: पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याविरोधात भाजपाने आज अतिशय आक्रमक पवित्रा घेतला. "महागाई कमी करणे जमत नसेल तर तात्काळ राजीनामा द्या," अशी कडक सूचना भाजपाने आज केली आहे.
""मनमोहनसिंगजी, आपण जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आहात. असे असतानाही भारताची अर्थव्यवस्था हाताळणे आपल्या हाताबाहेरचे काम झाले आहे. देशाचा राज्यकारभार चालविणेही तुम्हाला चार वर्षांच्या काळात कधीच जमले नाही. देशाचे आणखी वाटोळे करण्यापेक्षा तुम्ही तात्काळ राजीनामा देणे योग्य राहील. यातच देशाचे हित आहे,'' असे भाजपाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले.
पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये हेच डॉ. मनमोहनसिंग देशाचे अर्थमंत्री असताना महागाईने नवे शिखर गाठले होते. आज हेच मनमोहनसिंग देशाचे पंतप्रधान आहेत आणि महागाईने पुन्हा एकदा नवे शिखर गाठले आहे. म्हणजेच, मनमोहनसिंग अर्थमंत्री असोत वा पंतप्रधान, महागाईचे निदान त्यांना तेव्हाही करता आले नव्हते आणि आजही जमले नाही, असा दावा प्रसाद यांनी केला.
महागाईने आज ८.२४ टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. याच वर्षी ३१ मार्च रोजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी म्हटले होते की, आपल्या सरकारने जी पावले उचलली आहेत त्याच्या परिणामांनी जीवनावश्यक वस्तूंचे दर दोन आठवड्यातच कमी झालेले असतील. पण, आता आठ आठवडे लोटले आहेत आणि महागाईचा स्तर कमी होण्याऐवजी वाढच आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर इतके वाढले आहेत की, सर्वसामान्यांपुढे जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
देशात अन्नधान्याचे पीक विपूल प्रमाणात झाले. पण, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. सरकारला महागाईचे गणित सोडविता न आल्यानेच ही स्थिती उद्भवली आहे. कृषी मंत्री शरद पवार यांनीही देशात अन्नधान्याचा प्रचंड साठा असल्याचा दावा केला आहे. पण, सामान्यांना दिलासा देण्यात ते देखील अपयशीच ठरले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
संपुआ सरकारची फसवी वृत्ती, भ्रष्ट स्वभाव आणि आर्थिक गैरव्यवस्थापन या बाबी महागाई वाढण्यासाठी प्रामुख्याने जबाबदार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments: