पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): मांडवी नदीतून खनिज वाहतूक करणाऱ्या बार्जेंसकडून बसणाऱ्या सततच्या धक्क्यांमुळे असुरक्षिततेच्या गर्तेत सापडलेल्या दोन्ही मांडवी पुलांच्या तपासणीचे काम राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने (एनआयओ) पूर्ण केले असले तरी त्याबाबतचा अहवाल अद्याप सादर केला नसल्याने पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधांतरीच राहीला आहे. येत्या दोन महिन्यांत त्याबाबतचा अहवाल सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक के. एच. व्होरा यांनी "गोवादूत' शी बोलताना दिली.
जुवारी पुलानंतर मांडवी नदीवरील पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे वृत्त दै."गोवादूत' मधून प्रसिद्ध झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याने लगेच याबाबतचे काम "एनआयओ'कडे सोपवले होते. मांडवी नदीवरील दोन्ही पुलाखालून बार्जेस जाण्यासाठी निश्चित केलेल्या खांबांची तपासणी संस्थेने पूर्ण केली आहे. या सर्व खांबाची "व्हिडीओग्राफी' व "फोटोग्राफी' करून याबाबतचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर करण्यात येणार आहे. सध्या खात्याकडे काही "फाटोग्राफ' पाठवण्यात आले असले तरी या फोटोग्राफवरून काहीही अंदाज करणे शक्य नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभाग सातचे कार्यकारी अभियंते उल्हास केरकर यांनी दिली. प्रत्यक्षात अहवाल सादर झाल्यानंतर पुलांच्याबाबतीत तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यात येईल व त्यानंतरच पुढील कृतीची दिशा ठरवली जाईल, असेही ते म्हणाले.
खोल समुद्रात पुलांच्या खांबांची "व्हीडीओग्राफी' व "फोटोग्राफी' करणे जिकिरीचे काम होते व ते संस्थेच्या वैज्ञानिकांनी पूर्ण केले आहे. या "फोटोग्राफीवर' प्राथमिक अंदाज व्यक्त करून मतप्रदर्शन करणे योग्य होणार नाही, त्यामुळे प्रत्यक्षात सर्व बारकाव्यांचा अभ्यास करून तयार करण्यात येणाऱ्या अहवालानंतरच पुलाच्या असुरक्षिततेबाबत ठोस मतप्रदर्शन करता येईल, अशी माहिती व्होरा यांनी दिली. पाण्याचा जबर प्रवाह व त्यात खांबावर साचलेला समुद्रीमळ यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्याचे ते म्हणाले. पुलाच्या तपासणीबाबतचा प्रस्ताव वित्त खात्याकडे कित्येक दिवस धूळ खात पडला. तथापि, "गोवादूत'कडून या प्रकरणाचा सतत पाठपुरावा केल्यानंतर खात्याचे मुख्य अभियंते श्री. वाचासुंदर यांनी तात्काळ हे काम हाती घेण्याचे आदेश दिले.
२६ एप्रिल ०६ व १६ जानेवारी ०७ रोजी खनिज वाहतूक करणाऱ्या बार्जचा धक्का मांडवी पुलाला बसल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम खात्याकडे नोंद झाली होती. १६ जानेवारी रोजी बसलेल्या धक्क्याची तीव्रता जास्त असल्याने या अपघाताचा पंचनामा करून संबंधित बार्जमालकाकडून ४ लाख रुपये भरपाई वसूल करून घेण्यात आली होती. हा अपघात होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप खांबांची दुरुस्ती सोडाच, पण पाहणीही करण्याची तसदी संबंधित खात्याने घेतली नव्हती.
एनआयओकडून पुलाच्या या खांबांची पाहणी करून सर्वेक्षण करण्यासाठी तसेच पाण्याखालची "व्हिडीओग्राफी" करण्यासाठी एक प्रस्ताव २ जानेवारी ०८ रोजी वित्त खात्याकडे पाठवण्यात आला होता. तो प्रस्ताव तब्बल दोन महिन्यांनी संमत करण्यात आला. या कामावर सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च होणार आहेत. मांडवी नदीतून दररोज शेकडो खनिज वाहतूक करणाऱ्या बार्जचे वारंवार धक्के बसून दोन्ही पुलांच्या खांबांना धोका निर्माण झाला आहे. यावर नजर ठेवण्यासाठी सरकारकडे कोणतीही कायमस्वरूपी यंत्रणा नसल्याने हा लोकांच्या जीवाशी खेळ चालला असल्याचे उघड झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत पुलाच्या देखरेखीचे काम हाती घेण्यात येते. दरम्यान, जुन्या मांडवी पुलाच्या खांब क्रमांक ७, ८, ९ व नव्या पुलाच्या खांब क्रमांक १२, १३, १४ यांच्या खालून जलवाहतुकीची सोय करण्यात आली आहे.
-----------------------------------------
बार्जेस वाहतुकीवर अंकुश हवा : उल्हास केरकर
मांडवी नदीतून रोज खनिज मालाची वाहतूक करणाऱ्या बार्जेसवर नजर ठेवण्याची जबाबदारी कॅप्टन ऑफ पोर्टस्ची आहे. पुलाखालून जाण्यासाठी बार्जेसना खांब निश्चित करण्यात आले आहेत. या खांबांखालून जाताना वेगावर नियंत्रण ठेवण्याबरोबर बार्ज पुलाला धडकणार नाही याची काळजी त्यांनी घेण्याची गरज आहे. बार्जेसच्या या वाहतुकीवर कॅप्टन ऑफ पोर्टस्ने नजर ठेवण्याची गरज असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम खात्यातील राष्ट्रीय महामार्ग विभाग सातचे कार्यकारी अभियंता उल्हास केरकर यांनी यांनी व्यक्त केले.
------------------------------------------
पुलाच्या खांबांना सुरक्षा कठडा हवा: मास्कारेन्हास
पुलाखालून जाणाऱ्या प्रत्येक बार्जकडे लक्ष देणे कॅप्टन ऑफ पोर्टस्ला शक्य नाही. मुळात पुलाखालच्या खांबांना सुरक्षा कठडा तयार करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची असताना त्यांच्याकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची तक्रार कॅप्टन ऑफ पोर्टस्चे संचालक श्री. मास्कारेन्हास यांनी केली. पुलाखालून जाताना कोणती काळजी घ्यावी याबाबत सूचना व निर्देश बार्ज मालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांना सहा महिने कैद व दंडात्मक कारवाईची तजवीजही कायद्यात करण्यात आल्याचे ते म्हणाले.
----------------------------------------------
Wednesday, 4 June 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment