बंडखोर आघाडी गट मागणीशी ठाम
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)ः राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीबाबत आपल्या गटाची एक महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत बोलावली होती. परंतु श्री. पवार काही कामानिमित्त दिल्लीबाहेर असल्याने सदर बैठक लांबली आहे. ही बैठक येत्या बुधवार दि. ५ मार्च रोजी होण्याची शक्यता राष्ट्रवादी पक्षाच्या एका नेत्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, आघाडीचा बंडखोर गट, कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी यांच्यात झालेल्या "फॉम्युल्या'ची अंमलबजावणी अधिवेशनानंतर करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केल्याची खबर आहे. बंडखोर गट मात्र हट्टालाच पेटून हे बदल अर्थसंकल्पापूर्वीच व्हायला हवेत या मागणीशी ठाम आहेत.
कॉंग्रेस प्रणीत कामत सरकार वाचवण्यासाठी आघाडीचा बंडखोर गट, कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी यांच्यादरम्यान झालेल्या "फॉर्म्यूल्या'ची अंमलबजावणी करण्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अपयश आले आहे. सदर 'फॉर्म्यूला' कराराप्रमाणे मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांचा मंत्रिमंडळातील समावेशावर एकमत झाले होते. असे असतानाही कॉंग्रेसचा एकही नेता खुर्ची सोडण्यास तयार नसल्याने श्री. ढवळीकर अधांतरी आहेत. या "फॉर्म्यूल्या"त राष्ट्रवादी पक्षाच्या इतर काही महत्त्वाच्या मागण्यांचाही समावेश आहे. परंतु त्यातील एकही गोष्ट प्रत्यक्षात साध्य न झाल्याने बंडखोर गट संतप्त आहे. दरम्यान, श्री. पवार यांच्या गटात मगोपचे नेते सुदिन ढवळीकर, दीपक ढवळीकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व राष्ट्रवादीचे नेते पर्यटनमंत्री मिकी पाशेको, महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा व संसदीय सचिव नीळकंठ हळर्णकर यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर दोन्ही वेळा विधानसभेत बहुमत सिद्ध करू न शकलेल्या दिगंबर कामत यांना यावेळी अर्थसंकल्प अधिवेशनात सरकारचे अस्तित्वच पणाला लावावे लागणार आहे. यापूर्वी राज्यपाल व सभापती यांच्या मदतीने कामत यांनी वेळ मारून नेली. परंतु यावेळी मात्र त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याने तेही अस्वस्थ बनले आहेत.
-------------------------------------------
Tuesday, 4 March 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment