मारहाण, बंगल्याची नासधूस प्रकरण
बाबूश व जेनिफर यांची तक्रार
नोंदविण्याचा पोलिसांना आदेश
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) ः पणजी पोलिस स्थानकात झालेली मारहाण, बंगल्याची नासधूस व मुलाला झालेल्या मारहाणीची आमदार बाबूश आणि जेनिफर मोन्सेरात यांची तक्रार नोंद करून घेण्याचा आदेश आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एडगर फर्नांडिस यांनी दिला. पणजी पोलिस स्थानकावर या तक्रारीची नोंद करून घेतली जात नसल्याने न्यायालयाकडे दाद मागण्यात आली होती. दि. २४ फेब्रुवारी रोजी सदर अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता. पोलिस व फिर्यादीची बाजू ऐकून न्यायालयाने हा आदेश दिला.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निरज ठाकूर, उपअधीक्षक मोहन नाईक व निरीक्षक सुदेश नाईक यांनी अपहरण, दरोडा व हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दि. २२ रोजी पणजी पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती. परंतु या तक्रारीची कोणतीही दखल पोलिसांनी घेतली नसल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली होती.
सुनावणीवेळी न्यायाधीशांनी पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक फ्रान्सिस कोर्त यांना "तुम्ही तक्रार नोंद का करून घेतली नाही' असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी लेखी सादर केले आहे, असे सांगितले. "ते असू द्या, पण तुम्ही सांगा' असे सांगितल्यावर ते गप्प राहिले. यावेळी सरकारी वकिलांनी पोलिस स्थानकासमोर दि. १९ रोजी घडलेल्या रणकंदनात तक्रारदार आरोपी असल्याने तक्रारीची नोंद झाली नाही, असे सांगितले. आरोपीची तक्रार दाखल करून घेऊ नये, अशी तरतूद कोणत्या कायद्यात आहे, असा प्रश्न न्यायालयाने केला.
सदर तक्रारीची नोंद भा.दं. सं. कलम ३०७, ३२१, ३२२, ३२४, ३२५, ३२७, ३२९, ३३८, ३४०, ३४२, ३५२, ३५४, ३६३, ३८०, ३८२, ३९२, ३९४, ३९८, ४२०, ४४७, ४४८, ४४९, ४५१, ४५२, १२०(ब), ३४, १४६, १४८ खाली करण्याची मागणी या तक्रारीत केली होती.
दि. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९.३० पर्यंत मोर्चात सहभागी झालेले सर्वजण शांततेने पोलिस स्थानकाच्या बाहेर थांबले होते. यावेळी अचानक कोणतेही कारण नसताना पोलिसांनी मोर्चा करणाऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून लाठीमार केला. यावेळी आपण त्या ठिकाणाहून घराकडे जाण्यास निघालो. त्यादरम्यान अधीक्षक निरज ठाकूर, उपअधीक्षक मोहन नाईक व निरीक्षक सुदेश नाईक हे अन्य सशस्त्र पन्नास पोलिसांना घेऊन मिरामार येथील माझ्या बंगल्यात घुसले. तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकाला मारहाण करून चार वाहनांची नासधूस केली, तसेच पहिल्या मजल्यावरील टीव्ही, डीव्हीडी, पियानो, अन्य वस्तूंची तोडफोड केली. त्यांनी धार्मिक क्रॉसही सोडला नाही. आपल्या पत्नीचे दागिने, पैशांनी भरलेले आपले पाकीट, क्रेडिट कार्ड व आमदारकीचे ओळखपत्र चोरीला गेल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिस माझ्या ताळगाव येथील दुसऱ्या बंगल्यावर गेले. येथे अभ्यासाला बसलेला माझा मुलगा अमित, कामगार प्रकाश व बाबाजी यांना जबरदस्तीने उचलून पोलिस स्थानकावर आणले. ज्यावेळी माझी पत्नी त्यांची विचारपूस करण्यासाठी पोलिस स्थानकावर गेली, त्यावेळी तिला शिवीगाळ करून जबर मारहाण करण्यात आली. मला कोणतीही माहिती न देता त्यांना अटक करण्यात आली. परंतु माझ्या मुलाला अटक न करता, रात्री ८.३० ते १.३० पर्यंत बेकायदेशीररीत्या पोलिस स्थानकात ठेवून मारहाण करण्यात केल्याचे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे.
फिर्यादीच्या वतीने ऍड. हरून ब्राझ डिसा यांनी तर सरकारी वकील सुषमा माद्रेंकर यांनी बाजू मांडली.
०-------------------------------------०
Tuesday, 4 March 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment