Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 7 March 2008

गृहमंत्र्यांना डच्चू द्या ः पर्रीकर

स्कार्लेट मृत्युप्रकरणी सखोल चौकशीची गरज
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)ः हणजूण येथे स्कार्लेट नामक ब्रिटिश युवतीच्या संशयास्पद मृत्यूने आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील सुरक्षेबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. राज्याच्या या बदनामीला मूग गिळून सहन करणाऱ्या गृहमंत्री रवी नाईक यांना ताबडतोब डच्चू द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली आहे.
आज पणजी येथे भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक व मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर उपस्थित होते. राज्यात सध्या कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून बुडून मृत्यू, अमलीपदार्थ सेवन, एखादी टोळी किंवा पोलिसांकडूनच होणारी पर्यटकांची लुबाडणूक आदी प्रकार असेच सुरू राहिले तर पर्यटकांसाठी राज्य असुरक्षित बनण्याची भीती नाकारता येत नाही. स्कार्लेट हिच्या आईने उपस्थित केलेले मुद्दे अतिशय गंभीर असून सरकारने या प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी पर्रीकर यांनी पुढे केली.
स्कार्लेट हिच्या पहिल्या उत्तरीय तपासणीत उपस्थित झालेले मुद्देच संशयास्पद आहेत. तिच्या शरीरावर आढळणाऱ्या जखमांवरून तिला मारहाण करण्यात आल्याची शंका आहे. तिच्या फुस्फुसात खारे पाणी नसल्याचेही उघड झाल्याने हा घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता बळावल्याचे श्री. पर्रीकर म्हणाले.
यावेळी पर्रीकर यांनी इतरही अनेक मुद्दे उपस्थित करून पोलिस खात्याचे वाभाडेच काढले. स्कार्लेट हिला मृत्यूपूर्वी एका हॉटेलात पहाटे ४ वाजता पाहण्यात आल्याची जबानी एकाने दिल्याची खबर आहे. आता हॉटेल पहाटे चार वाजता खुले कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रात्री उशिरा व पहाटेपर्यंत चालणारी हॉटेल ही केवळ मद्य व अमली पदार्थामुळेच खुली असू शकतात, असे सांगून किनारी भागांत कशाप्रकारे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, त्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे श्री. पर्रीकर म्हणाले.
दरम्यान, स्कार्लेट हिच्या आईने आज पर्रीकर यांची भेट घेतली. स्कार्लेट हिच्या संशयास्पद मृत्यूबाबत तिने फोटोसहित अनेक मुद्दे यावेळी उपस्थित केले असून आपल्या मुलीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

No comments: